जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पदक जिंकण्यात अपयश ; अविनाश साबळे ११व्या स्थानावर

अडथळ्यांच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या अविनाशला पात्रता फेरीत ८.१८.४४ इतक्या वेळेसह पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविता आले होते
जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताला पदक जिंकण्यात अपयश ; अविनाश साबळे ११व्या स्थानावर
Published on

अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भारताच्या अविनाश साबळेला मंगळवारी सकाळी पदक जिंकण्यात अपयश आले. अंतिम फेरीत तो ११व्या स्थानावर राहिला. भारताच्या पदक मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला. दरम्यान, मोरोक्कोच्या सौफिअाने एल बक्कलीने ८.२५.१३ वेळेसह सुवर्णपदक जिंकले. इथोपियाच्या खेळाडूने रौप्य तर केनियाच्या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.

तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या अविनाशला पात्रता फेरीत ८.१८.४४ इतक्या वेळेसह पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविता आले होते. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अंतिम फेरीत अविनाशने ८.३१.७५ इतका वेळ घेतला आणि तो ११व्या स्थानावर राहिला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. याआधी २०१९मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेत अविनाशने १३वे स्थान मिळविले होते. सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या अविनाशला अंतिम फेरीत ती लय राखण्यात अपयश आले. ऑक्टोबर २०१९ नंतरची ही त्याची सर्वात संथ कामगिरी ठरली.

अविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम केला होता; मात्र अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिम्पिकच्या आधी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतसुद्धा अविनाशने मोठे यश मिळविले होते. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता.

अविनाश हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी सहा किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करीत असे. १२वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या महार रेजिमेंटच्या सेवेत आहे.

logo
marathi.freepressjournal.in