"शाळेतही चांगले रेफ्री होते": पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका; FIFA वर्ल्ड कप पात्रतेचे भारताचे स्वप्न उद्ध्वस्त; चाहते संतापले

सुनील छेत्रीने निवृत्ती पत्करल्यानंतर भारतीय संघाचा हा पहिलाच सामना होता. गुरप्रीत सिंग संधूच्या नेतृत्वाखाली या लढतीत खेळताना भारताला विजय अनिवार्य होता.
"शाळेतही चांगले रेफ्री होते": पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका; FIFA वर्ल्ड कप पात्रतेचे भारताचे स्वप्न उद्ध्वस्त; चाहते संतापले

नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचे २०२६च्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. मंगळवारी रात्री त्यांना विश्वचषक पात्रता फेरीतील दुसऱ्या टप्प्याच्या अखेरच्या सामन्यात कतारकडून २-१ असा पराभव पत्करावा लागला. पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा भारताला फटका बसला.

सुनील छेत्रीने निवृत्ती पत्करल्यानंतर भारतीय संघ प्रथमच एखादा सामना खेळत होता. गुरप्रीत सिंग संधूच्या नेतृत्वाखाली या लढतीत खेळताना भारताला विजय अनिवार्य होता. अ-गटात समावेश असलेला भारतीय संघ या लढतीपूर्वी ५ सामन्यांतील १ विजय, २ बरोबरी आणि २ पराभवांच्या ५ गुणांसह दुसऱ्या स्थानी होता. कतारने आधीच आगेकूच केली होती. दुसरीकडे कुवैतने अफगाणिस्तानला नमवल्याने भारताला ही लढत जिंकणे गरजेचे होते. मात्र पंचांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळे भारताची तिसऱ्या स्थानी घसरण झाली. कुवैतने ७ गुणांसह दुसरे स्थान काबिज करून कतारसह आगेकूच केली.

भारतासाठी चांग्टेने ३७व्या मिनिटाला गोल झळकावला. मध्यांतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात यूसुफ अमानने ७३व्या मिनिटाला पहिला, तर अहमद अल रॉलने ८५व्या मिनिटाला दुसरा गोल झळकावून कतारचा विजय पक्का केला. यातील कतारचा पहिला गोल हा वादग्रस्त ठरल्याचे म्हटले जात आहे. तसेच भारतीय फुटबॉल महासंघाने याविरोधात फिफाकडे दाद मागितली आहे. मात्र भारतीय संघाचे स्वप्न पुन्हा एकदा उद्ध्वस्त झाले, हे मात्र खरे.

नेमके घडले काय?

-सामन्याच्या ७३व्या मिनिटाला यूसुफ अमानने कतारसाठी बरोबरी साधणारा गोल नोंदवला. मात्र प्रत्यक्षात गोल करण्यापूर्वी चेंडूने आधीच क्रॉस-लाइन ओलांडली होती. भारताचा गोलरक्षक गुरप्रीतला लागून चेंडू रेषेपलीकडे गेल्याचे दिसत होते. मात्र त्याचवेळी कतारच्या खेळाडूने पायाने चेंडूस आत ढकलले व दुसऱ्या खेळाडूला पास केला. यावेळी चेंडू बाहेर गेल्याने भारताचे खेळाडू थांबले, मात्र कतारच्या यूसुफने पासचे गोलमध्ये रुपांतर केले व जल्लोष केला.

-पंचांनी हा गोल ग्राह्य न धरता कॉर्नर दर्शवणे गरजेचे होते. मात्र येथे ‘व्हीएआर’ची सुविधा उपलब्ध नसल्याने पंचांनी गोल कायम राखला. भारतीय खेळाडूंनी याविषयी बाचाबाची करूनही पंचांनी निर्णय बदलला नाही.

"शाळेतही चांगले रेफ्री होते"

समाजमाध्यमांवर ही चित्रफीत व्हायरल झाली आहे. भारतीय खेळाडूंवर अन्याय झाल्याचे म्हटले जात आहे. फुटबॉल चाहते चांगलेच चिडले असून ‘व्हीएआर’ची सुविधा का नव्हती, शाळेतही यापेक्षा चांगले रेफ्री होते, अशा प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in