आयसीसी पुरस्कारासाठी भारताचे चौघे शर्यतीत

दरवर्षी जानेवारी महिन्यात आयसीसीकडून वार्षिक पुरस्काराचे नामांकन तसेच वितरण करण्यात येते.
आयसीसी पुरस्कारासाठी भारताचे चौघे शर्यतीत

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) २०२३ या वर्षातील पुरस्कारांसाठी भारताच्या चौघांना नामांकन लाभले आहे. एकदिवसीय प्रकारात अनुभवी विराट कोहली, युवा शुभमन गिल हे फलंदाज तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुरस्काराच्या शर्यतीत आहे. वर्षातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूच्या शर्यतीत भारताच्या एकमेव सूर्यकुमार यादवला स्थान लाभले आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात आयसीसीकडून वार्षिक पुरस्काराचे नामांकन तसेच वितरण करण्यात येते. विजेत्यांची निवड करताना चाहत्यांची मते तसेच परीक्षकांच्या मतांचा एकत्रित आढावा घेण्यात येतो. परीक्षकांमध्ये माजी क्रिकेटपटू, समालोचक, आयसीसी हॉल ऑफ फेमचे सदस्य तसेच आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो. २०२२ या वर्षात सूर्यकुमार यादव हा टी-२०तील सर्वोत्तम क्रिकेटपटू ठरला होता. यावेळी त्याला सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावण्याची संधी आहे. मात्र झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, न्यूझीलंडचा मार्क चॅपमन व युगांडाचा अल्पेश रामजानी यांच्याकडून सूर्यकुमारला कडवी चुरस लाभेल. ३३ वर्षीय सूर्यकुमारने २०२३मध्ये १७ टी-२० सामन्यांत ४८च्या सरासरीने ७३३ धावा केल्या. यामध्ये दोन शतकांचाही समावेश आहे.

वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूच्या शर्यतीत गिल, शमी व विराट यांच्यासह न्यूझीलंडचा डॅरेल मिचेलही शर्यतीत आहे. विराटने २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात ३ शतकांसह सर्वाधिक ७६५ धावा केल्या. त्याशिवाय एकदिवसीय प्रकारात सर्वाधिक ५० शतके झळकावण्याचा विक्रमही नावावर केला. २०२३ या वर्षात विराटने एकंदर २७ सामन्यांत ७२च्या सरासरीने १,३७७ धावा केल्या. त्याने वर्षभरात ६ शतके व ८ अर्धशतके झळकावली. २४ वर्षीय गिलने २०२३ या वर्षातील २९ सामन्यांत ५ शतकांसह १,५८४ धावा केल्या. तसेच २४ झेल घेतले. त्याने वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध द्विशतकही साकारले. विश्वचषकात त्याने ४४च्या सरासरीने ४ अर्धशतकांसह ३५४ धावा केल्या.

३३ वर्षीय शमीने विश्वचषकात अवघ्या ७ सामन्यांत सर्वाधिक २४ बळी मिळवून भारताला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. शमीने वर्षभरातील १९ एकदिवसीय सामन्यांत खेळताना फक्त १०.७च्या सरासरीने ४३ बळी मिळवले.

नामांकने

वर्षातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू

सूर्यकुमार यादव (भारत)

सिकंदर रझा (झिम्बाब्वे)

मार्क चॅपमन (न्यूझीलंड)

अल्पेश रामजानी (युगांडा)

वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू

विराट कोहली (भारत)

मोहम्मद शमी (भारत)

शुभमन गिल (भारत)

डॅरेल मिचेल (भारत)

logo
marathi.freepressjournal.in