
नवी दिल्ली : भविष्यातील तारांकित महिला क्रिकेटपटूंचा शोध घेण्याची मोहीम शनिवारपासून सुरू होणार आहे. मलेशिया येथे १८ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व रंगणार आहे. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे या स्पर्धेत जेतेपद राखण्याचे ध्येय असेल.
२०२३मध्ये दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम १९ वर्षांखालील महिलांचा टी-२० विश्वचषक रंगला. त्यावेळी शफाली वर्माच्या नेतृत्वात भारताने जेतेपद मिळवले होते. आता दोन वर्षांनी पुन्हा एकदा जेतेपद काबिज करण्याची संधी भारताला आहे. डिसेंबरमध्ये झालेल्या आशिया चषकात निकीच्याच नेतृत्वात भारताने बाजी मारली होती. त्यामुळे विश्वचषकातसुद्धा त्या दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे.
एकंदर १६ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत चार गट पाडण्यात आले आहेत. भारताच्या अ-गटात यजमान मलेशिया, वेस्ट इंडिज व श्रीलंका यांचा समावेश आहे. भारतीय संघ १९ जानेवारी रोजी विंडीजविरुद्धच्या लढतीद्वारे आपल्या अभियानाचा प्रारंभ करणार आहे. भारताचे साखळी सामने दुपारी १२ वाजता सुरू होतील. त्यापूर्वी, शनिवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड लढतीद्वारे विश्वचषकाला प्रारंभ होईल. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघांकडून भारताला कडवी झुंज मिळू शकते.
या स्पर्धेत प्रत्येक गटातून आघाडीचे तीन संघ आगेकूच करणार असून त्यानंतर सुपर-सिक्स फेरी रंगणार आहे. सुपर-सिक्समध्ये १२ संघांना दोन गटांत विभागण्यात येईल. त्यांचे साखळीचे गुणही पुढे ग्राह्य धरले जातील. मग सुपर-सिक्स फेरीत दोन्ही गटांतील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ३१ जानेवारीला उपांत्य, तर २ फेब्रुवारीला अंतिम सामना होईल. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स २ वाहिनीसह जिओ स्टार ॲपवर करण्यात येईल. भारतीय वेळेनुसार सकाळी ८ आणि दुपारी १२ यावेळी साखळी फेरीतील दोन लढती सुरू होतील.
स्पर्धेची गटवारी
अ-गट : भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, मलेशिया
ब-गट : इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका
क-गट : न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, नायजेरिया, सामोआ
ड-गट : ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेपाळ, स्कॉटलंड
भारताचे साखळी सामने
१९ जानेवारी : वि. वेस्ट इंडिज (दुपारी १२ वा.)
२१ जानेवारी : वि. मलेशिया (दुपारी १२ वा.)
२३ जानेवारी : वि. श्रीलंका (दुपारी १२ वा.)
सुपर-सिक्स आणि पुढील फेरीच्या वेळा नंतर स्पष्ट होतील.