
मुंबई : २५ नोव्हेंबरपासून सिंगापूरमध्ये चीनच्या डिंग लिरेनविरुद्ध होणारी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाची लढत भारताचा डी. गुकेश १२व्या फेरीतच जिंकेल, असा विश्वास भारताचे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे आणि अभिजीत कुंटे यांनी व्यक्त केला.
“वयाच्या १८व्या वर्षीच गुकेश जागतिक लढतीसाठी आव्हानवीर ठरला आहे. चीनच्या अनुभवी डिंगला गुकेशच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. यंदाच्या वर्षात गुकेशच्या कामगिरीत कमालीचे सातत्य राहिले आहे. विशेष म्हणजे गुकेशची खेळण्याची विशिष्ट शैली आहे. तो कधीही चूक करत नाही,” असे ठिपसे म्हणाले. मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या एका परिसंवादात ठिपसे आणि कुंटे बोलत होते. “गुकेशच्या खेळातील अचूकतेची पातळी इतकी मोठी आहे, की त्याला थकवा आला किंवा एकाग्रता ढळली तरच त्याच्याकडून चूक होते. ही लढत १२व्या फेरीपुढे जाणारच नाही. गुकेश या फेरीतच विजेतेपद निश्चित करेल,” असेही ठिपसे यांनी सांगितले.
अभिजीत कुंटे यांनीही १२व्या फेरीतच जागतिक विजेतेपदाची लढत संपेल असे सांगितले. “गुकेश १८, तर लिरेन ३२ वर्षांचा आहे. पण पटावरील खेळण्याची ताकद बघितली, तर गुकेशला प्रौढ म्हणावे लागेल. लिरेन जागतिक विजेता असला तरी सध्या त्याची कामगिरी फारच ढासळलेली आहे. गुकेश अभ्यासू खेळाडू आहे. त्याच्याकडे संयमाची कमतरता नाही. त्याची शैली ही कास्पारोव्हसारखी आहे,” असे कुंटे म्हणाले.
काही महिन्यांपूर्वी झालेल्या चॅलेंजर स्पर्धेत गुकेशने भारताच्या प्रज्ञानंद, विदीतसह तारांकित खेळाडूंना नमवून जागतिक लढतीची पात्रता मिळवली.
चेन्नई ग्रँडमास्टर्स स्पर्धेत अरविंद अजिंक्य
ग्रँटमास्टर अरविंद चिदम्बरमने अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये चमकदार कामगिरी करताना चेन्नई ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेचे जेतेपद मिळवले. तर, ग्रँडमास्टर वी प्रणवने अपराजित राहत चॅलेंजर्स विभागाचे विजेतेपद पटकावले. मास्टर्स विभागातील शीर्ष स्थानासाठी तिरंगी लढत पाहायला मिळाली. यामध्ये अरविंदने ग्रँडमास्टर लेव्हॉन पहिल्या ब्लिट्झ (अतिजलद) प्लेऑफमध्ये पराभूत केले. मग, काळ्या मोहऱ्यांसह खेळताना दुसरी लढत बरोबरीत सोडवली. त्याने परहम मघसूदलूविरुद्धचा पुढील सामना जिंकला. तर, शीर्ष स्थानावर असलेल्या अर्जुन एरिगेसी व लेव्हॉन यांनी बरोबरीची नोंद केली. लेव्हॉनने ग्रँडमास्टर अमीन टाबाटाबाईविरुद्ध बरोबरी नोंदवली. तर, एरिगेसी व ग्रँडमास्टर मॅक्सिम-व्हॅचिएर लाग्रेव्ह यांनाही बरोबरीवर समाधान मानावे लागले. अरविंद टायब्रेकमधील चांगल्या कामगिरीच्या आधारे शीर्षस्थानी राहिला.