भारताचा इंग्लंड, स्पेन, वेल्ससह ड-गटात समावेश

हॉकी विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला होता
भारताचा इंग्लंड, स्पेन, वेल्ससह ड-गटात समावेश

पुढील वर्षी जानेवारी महिन्यात भुवनेश्वर आणि रौरकेला येथे होणाऱ्या पुरुषांच्या एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताचा इंग्लंड, स्पेन आणि वेल्स यांच्यासह ड-गटात समावेश करण्यात आला आहे. गुरुवारी १६ संघांची गटवारी जाहीर करण्यात आली आहे.

१३ ते २९ जानेवारी दरम्यान हॉकी विश्वचषक रंगणार असून यजमान भारताला २०१८मध्ये झालेल्या अखेरच्या हॉकी विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँड्सकडून पराभव पत्करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले. तर राष्ट्रकुल स्पर्धेत त्यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. २०१८मध्ये बेल्जियमने नेदरलँड्सला नमवून विश्वचषक उंचावला होता.

भारताला जेतेपदाची सर्वोत्तम संधी!

भारतीय संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा योग्य भरणा असून यंदा त्यांना हॉकी विश्वचषक जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक म्हणाले. “२०१८च्या विश्वचषकात भारताला बाद फेरीत हार मानावी लागली. परंतु यावेळी आपला संघ अधिक बलवान झाला आहे. टोक्यो ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुलमधील यशानंतर भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे मायदेशात सलग दुसरा विश्वचषक खेळताना आपला संघ यावेळी जेतेपद मिळवेल, अशी आशा आहे,” असे पटनायक म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in