भारताची भालाफेकपटू अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल; भारताच्या पदकाच्या आशा बळावल्या

भालाफेक प्रकारात अन्नूने अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले
भारताची भालाफेकपटू अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल; भारताच्या पदकाच्या आशा बळावल्या
Published on

भारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी जागतिक अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. अन्नूने सलग दुसऱ्यांदा असा पराक्रम केल्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा बळावल्या आहेत. शनिवारी ती अंतिम फेरीत पदकासाठी दावेदारी पेश करेल.

युजीन, अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत महिलांच्या भालाफेक प्रकारात अन्नूने अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून अंतिम फेरीतील स्थान पक्के केले. अन्नूचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. तर दुसऱ्या प्रयत्नामध्ये तिने ५५.३५ मीटर अंतर सर केले. त्यामुळे तिसऱ्या संधीत तिच्यावर दडपण होते. परंतु अन्नूने चाहत्यांची निराशा न करता ५९.६० मीटर अंतर गाठले. अन्नूने एकूण आठवे स्थान मिळवले. अव्वल १२ खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असून भारतीय वेळेनुसार शनिवारी पहाटे ५.३० वाजता या गटाची अंतिम फेरी रंगेल.

राष्ट्रीय विक्रम नावावर असलेल्या २९ वर्षीय अन्नूला ६० मीटरचे अंतर गाठण्यात अपयश आले. तिने यंदाच्या हंगामात ६३.८२ मीटर अंतर सर केले होते. दरम्यान, अंतिम फेरीत अन्नूला पदक प्राप्त करण्यासाठी कडवा संघर्ष करावा लागू शकतो. आघाडीच्या तीन स्पर्धकांनी ६२ मीटर अंतर कापल्याने अन्नूला भालाफेकीत अधिक जोर लावावा लागेल. अन्नूला २०१९मध्ये दोहा येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत आठव्या स्थानी समाधान मानावे लागले होते. यंदा तिने पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठली असल्याने तिच्याकडून पदकाच्या अपेक्षा बळावल्या आहेत. तिसऱ्यांदा जागतिक स्पर्धेत खेळणाऱ्या अन्नूला २०१७मध्ये लंडन येथील जागतिक स्पर्धेत पात्रता फेरीतच निराशेला सामोरे जावे लागले होते.

भारताच्या पारुलकडून निराशा

महिलांच्या ५,००० मीटर धावण्याच्या प्रकारात भारताच्या पारुल चौधरीला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. पारुलने तब्बल १५.५४ मिनिटे इतकी वेळ नोंदवत ३१वा क्रमांक मिळवला. २७ वर्षीय पारुलने यंदाच्या हंगामात १५.३९ मिनिटे ही सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. परंतु यावेळी तिला कामगिरी उंचावता आली नाही.

logo
marathi.freepressjournal.in