लक्ष्य उपांत्य फेरीत पराभूत; भारताचेही आव्हान संपुष्टात

ख्रिस्टीच्या विजयाने पुरुष एकेरीतील अंतिम लढत इंडोनेशियाच्याच खेळाडूंमध्ये होणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत गिंटिंगने ख्रिस्तो पोपोवला १९-२१, २१-५, २१-११ असे नमवले.
लक्ष्य उपांत्य फेरीत पराभूत; भारताचेही आव्हान संपुष्टात

बर्मिंगहॅम : ऑलिम्पिक पात्रतेच्या जवळ आलेल्या भारताच्या लक्ष्य सेनची ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेतील मोहीम उपांत्य फेरीत जिगरबाज खेळानंतर संपुष्टात आली. इंडोनेशियाच्या जोनाथान ख्रिस्टीने लक्ष्यवर २१-१२, १०-२१, २१-१५ असा विजय मिळवला. लक्ष्यच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

ख्रिस्टीच्या विजयाने पुरुष एकेरीतील अंतिम लढत इंडोनेशियाच्याच खेळाडूंमध्ये होणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत गिंटिंगने ख्रिस्तो पोपोवला १९-२१, २१-५, २१-११ असे नमवले. ख्रिस्टीविरुद्ध पहिल्या गेममध्ये लक्ष्यने ३-१ अशी आघाडी मिळवली. मात्र, पुढे ख्रिस्टीने प्रथम ९-६ आणि नंतर सलग पाच गुण घेत १४-७ अशी आघाडी घेतली. ती कायम राखताना त्याने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये लक्ष्यने ४-३ अशा स्थितीतून सलग सात गुणांची कमाई करताना ११-३ अशी मोठी आघाडी मिळवली. यानंतर त्याने ख्रिस्टीला पुनरागमनाची संधी दिली नाही.

निर्णायक तिसऱ्या गेममध्ये ख्रिस्टीने ८-८ अशा स्थितीतून वेगवान फटक्यांच्या जोरावर आघाडी कायम राखली. त्याने १५-१२ अशा स्थितीतून सलग पाच गुण घेत २०-१२ अशी आघाडी घेतली. लक्ष्यने झुंज देत तीन ‘मॅच पॉइंट’ वाचवले. मात्र, एका क्षणी लक्ष्यचे शटल नेटमध्ये अडकले आणि ख्रिस्टीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

यापूर्वी, महिला एकेरीत पी. व्ही. सिंधूला दुसऱ्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. त्याशिवाय दुहेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या सात्विक-चिरागच्या जोडीलासुद्धा यावेळी उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला. पुरुष एकेरीत एस. एस. प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत यांना अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले.

गेल्या २३ वर्षांत भारताच्या एकाही खेळाडूला ऑल इंग्लंड स्पर्धा जिंकता आलेली नाही. २००१मध्ये पुलेला गोपीचंद यांनी ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर भारताचा जेतेपदाचा दुष्काळ कायम आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in