एकदिवसीय सामन्यांत भारताची आघाडी,इंग्लंडवर १० विकेट्स आणि १८८ चेंडू राखून विजय

सामनावीर जसप्रीत बुमराहने १९ धावांच्या मोबदल्यात सहा बळी टिपून विजयात मोलाचा वाटा उचलला.
 एकदिवसीय सामन्यांत भारताची आघाडी,इंग्लंडवर १० विकेट्स आणि  १८८ चेंडू राखून विजय
Published on

ओव्हलवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर १० विकेट्स आणि तब्बल १८८ चेंडू राखून विजय मिळवत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील १-०ने आघाडी घेतली. विजयासाठीचे अवघ्या १११ धावांचे लक्ष्य भारताने १८.४ षट‌्कांत एकही गडी बाद होऊ न देता ११४ धावा करीत साध्य केले. शिखर धवन (५४ चेंडूंत नाबाद ३१) आणि कर्णधार रोहित शर्मा (५८ चेंडूंत नाबाद ७६) यांनी दमदार फलंदाजी करीत भारताला विजयपथावर नेले. सामनावीर जसप्रीत बुमराहने १९ धावांच्या मोबदल्यात सहा बळी टिपून विजयात मोलाचा वाटा उचलला.

विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी सावध सुरुवातीनंतर जोरदार फटकेबाजी केली. पहिल्या पाच षट्कांमध्ये भारताच्या बिनबाद १४ धावा झाल्या होत्या. रोहितने पाच षट्कार आणि सात चौकार लगावले. धवनने चार चौकार ठोकत त्याला शानदार साथ दिली.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरविताना इंग्लंडच्या संघाला २५.२ षट्कांत ११० धावांत गुंडाळले. जसप्रीत बुमराहच्या प्रभावी गोलंदाजीपुढे इंग्लंडचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. बुमराहने अवघ्या १९ धावा देत सहा बळी टिपून मोलाची कामगिरी केली. मोहम्मद शमीने तीन विकेट्स घेऊन त्याला शानदार साथ दिली. प्रसिद्ध कृष्णाने एक फलंदाज बाद केला. यजमान इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाला मोठ्या जोशात सुरुवात केली; पण दुसऱ्या षट्कातील चौथ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने इंग्लंडला जोरदार धक्का दिला. धावफलकावर अवघ्या सहा धावा लागलेल्या असताना सलामीवीर जेसन रॉय शून्यावर त्रिफळाचीत झाला.

त्याच षट्कात जसप्रीत बुमराहने जो रूटलाही शून्यावर माघारी धाडले. रूटला झेल पंतने टिपला. इंग्लंडची अवस्था दोन बाद सहा अशी झाली. मग तिसऱ्या षट्कातील चौथ्या चेंडूवर बेन स्टोक्सही खाते न उघडताच चालता झाला. मोहम्मद शमीने त्याला पंतच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.

जॉनी बेअरस्टोला जसप्रीत बुमराहने पंतच्या हाती सोपवून इंग्लंडची अवस्था चार बाद १७ अशी केली. इन-फॉर्म फलंदाज बेअरस्टोला अवघ्या सात धावा करता आल्या. लियाम लिव्हिंगस्टोनचा शून्यावर दांडा गुल करत बुमराहने इंग्लंडची अवस्था ७.५ षट्कात ५ बाद २६ अशी दयनीय केली. इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकल्याचेच ते द्योतक होते. इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली.

पहिल्या १० षट्कांमध्ये इंग्लंडच्या पाच बाद ३० धावा झाल्या. प्रसिद्ध कृष्णाने मोईन अलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपला. मोईन अलीने १४ धावा केल्या.

कर्णधार जोस बटलरकडून मोठ्या अपेक्षा असतानाच मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल सूर्यकुमार यादवने टिपला. बटलरने ३२ चेंडूंत ३० धावा करताना सहा चौकार लगावले.

क्रेग ओव्हरटनला शमीने ८ धावांवर त्रिफळाचीत केले. २० षट्कांमध्ये इंग्लंडच्या आठ बाद ८४ धावा झाल्या. २२व्या षट्कामध्ये इंग्लंडच्या धावांचे शतक फलकावर लागले. दयनीय सुरुवातीनंतर इंग्लंडने २१.५ षट्कांमध्ये ८ बाद १०० धावा करीत तीन अंकी धावसंख्या गाठण्यात यश मिळविले. ब्रायडन कार्स (२६ चेंडूंत १५) आणि डेव्हिड विली (२६ चेंडूंत २१) यांनी धावसंख्येत भर घालण्याचे प्रयत्न केले; परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दोघांनाही त्रिफळाचीत करून बुमराहने इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. दरम्यान, मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे विराट कोहली खेळू न शकल्याने त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in