मुंबई इंडियन्सला अखेर दिलासा; सूर्यकुमार पुनरागमनासाठी सज्ज

मुंबई इंडियन्सला अखेर दिलासा; सूर्यकुमार पुनरागमनासाठी सज्ज

३३ वर्षीय सूर्यकुमार डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला. त्यानंतर पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे तो तब्बल तीन महिने क्रिकेटपासून दूर राहिला. यादरम्यान सूर्यकुमारवर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली.

मुंबई : टी-२० प्रकारातील भारताचा आघाडीचा फलंदाज सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा मैदानात चौफेर फटकेबाजी करण्यासाठी सज्ज आहे. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) सूर्यकुमार पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे बुधवारी जाहीर केले. त्यामुळे सलग तीन पराभवांसह गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबई इंडियन्सलासुद्धा दिलासा मिळाला आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात सूर्यकुमार खेळण्याची दाट शक्यता आहे.

३३ वर्षीय सूर्यकुमार डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा सामना खेळला. त्यानंतर पायाच्या घोट्याच्या दुखापतीमुळे तो तब्बल तीन महिने क्रिकेटपासून दूर राहिला. यादरम्यान सूर्यकुमारवर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली. “सूर्यकुमार आता खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. एनसीएमध्ये तो काही सराव सामनेसुद्धा खेळला. काही दिवसांपूर्वी झालेल्या पहिल्या तंदुरुस्त चाचणीत तो १०० टक्के फिट वाटला नाही. त्यामुळेच आम्ही त्याला आणखी काही दिवस येथेच थांबण्याचे सुचवले. मात्र आता तिसऱ्या चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर तो मुंबई इंडियन्स संघात दाखल होऊ शकतो,” असे एनसीएचा पदाधिकारी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाला.

मुंबईने आयपीएलमध्ये सुरुवातीचे तीन सामने गमावले आहेत. सूर्यकुमारच्या समावेशामुळे मुंबईची फलंदाजी बळकट होईल. त्याशिवाय १ जूनपासून रंगणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने सूर्यकुमार तंदुरुस्त होणे भारताच्या दृष्टीने मोलाचे आहे.

मावी स्पर्धेबाहेर; मुस्तफिझूर माघारी

लखनऊच्या संघात असलेला वेगवान गोलंदाज शिवम मावी पायाच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरल्याने तो संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. २५ वर्षीय मावी ऑगस्ट २०२३मध्ये अखेरचा सामना खेळला होता. २०२३च्या आयपीएलमध्ये त्याला गुजरातकडून एकही सामना खेळण्याची संधी लाभली नाही. मग लिलावात त्याला लखनऊने ६.४ कोटी किमतीत खरेदी केले. मात्र दुर्दैवाने तो स्पर्धेबाहेर गेला आहे. त्याशिवाय चेन्नईचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमान टी-२० विश्वचषकाच्या व्हिसा संबंधित कामासाठी बांगलादेशला माघारी परतला आहे. तो शुक्रवारी हैदराबादविरुद्धच्या लढतीसाठी अनुपलब्ध असेल. रहमानने ३ सामन्यांत ७ बळी मिळवले असून पर्पल कॅपच्या शर्यतीत तो आघाडीवर आहे. ८ एप्रिलला कोलकाताविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी मुस्तफिझूर परतेल, असे अपेक्षित असल्याचे चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाने सांगितले.

पारदर्शकता नसल्याने हार्दिकला फटका -शास्त्री

हार्दिकला मुंबई इंडियन्सचा कर्णधारपद करताना संघ व्यवस्थापनाने अधिक पारदर्शकता बाळगणे गरजेची होती, असे मत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नोंदवले. “आयपीएल ही एक फ्रँचायझी स्पर्धा असून येथे संघमालकाच्या इच्छेनुसार सर्व काही घडते. त्यामुळे त्यांनी हार्दिकला मुंबईचा कर्णधार करण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र त्याला थेट कर्णधार म्हणून घोषित करताना मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने पारदर्शकता राखणे अपेक्षित होते. कदाचित रोहितने स्वत:हून समोर येत अथवा प्रशिक्षकांनी पत्रकार परिषदेत येऊन हा निर्णय जाहीर केला असता, तर अधिक चांगले झाले असते,” असे शास्त्री म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in