भारताचे महारथी पदकांची लयलूट करण्यासाठी सज्ज; राष्ट्रकुलच्या इतिहासातील सर्वोत्तम यशाचा निर्धार !

यंदा ऑलिम्पिकमधील कामगिरीद्वारे प्रेरणा घेत भारताचे शिलेदार राष्ट्रकुलच्या इतिहासातील सर्वोत्तम पदकसंख्येची नोंद करतील
भारताचे महारथी पदकांची लयलूट करण्यासाठी  सज्ज; राष्ट्रकुलच्या इतिहासातील सर्वोत्तम यशाचा निर्धार !

चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर शुक्रवारी भारताचे क्रीडापटू विविध प्रकारांत आपले भवितव्य आजमावतील. एकीकडे प्रतिष्ठित स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न तसेच कोरोनाच्या साथीवर विजयश्री मिळवण्यासह पदकांची लयलूट करण्याच्या निर्धाराने भारताचे २१५ महारथी सज्ज झाले आहेत. त्यामुळे यंदा ऑलिम्पिकमधील कामगिरीद्वारे प्रेरणा घेत भारताचे शिलेदार राष्ट्रकुलच्या इतिहासातील सर्वोत्तम पदकसंख्येची नोंद करतील, अशी आशा देशभरातील तमाम चाहते बाळगून आहेत.

क्रिकेट

राष्ट्रकुल स्पर्धेत २४ वर्षांनी क्रिकेटचे पुनरागमन होत असून शुक्रवारी होणाऱ्या अ-गटातील सलामीच्या लढतीत भारतीय महिला संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला यंदा पदकाचे दावेदार मानले जात असून त्यांना या गटात बार्बाडोस आणि पाकिस्तानशीही दोन हात करावे लागतील. स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा यांसारखे फलंदाज तसेच स्नेह राणा, राधा यादव, जेमिमा रॉड्रिग्ज यांचाही समावेश असल्याने भारतीय संघाचा समतोल साधला गेला आहे. गोलंदाजीत राजेश्वरी गायकवाड आणि पूजा वस्त्राकार यांच्यावर भारताची मदार आहे. मिताली राज आणि झुलन गोस्वामीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

बॅडमिंटन

बॅडमिंटनमध्ये भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध शुक्रवारी सांघिक प्रकारातील सलामीची लढत खेळणार आहे. पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन यांसारखे दिग्गज खेळाडू भारतीय संघात असल्याने त्यांचे पारडे जड असून भारताला या गटात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्याशीसुद्धा झुंज द्यायची आहे.

दुहेरीत साित्वकसाइराज रंकीरेड्डी-चिराग शेटट्ी तसेच गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली यांची जोडी चमकदार कामगिरी करू शकते. यंदा नेमबाजी राष्ट्रकुलमधून हद्दपार करण्यात आली असून नीरज चोप्रासुद्धा स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे बॅडमिंटनपटूंकडून चाहत्यांना पदकाची सर्वाधिक अपेक्षा आहे.

हॉकी

गोलरक्षक सविता पुनियाच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघ शुक्रवारी घानाविरुद्धच्या लढतीने आपल्या अभियानाला प्रारंभ करतील. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांचे कांस्यपदक थोडक्यात हुकले. परंतु यंदा राष्ट्रकुलमधील पदकदुष्काळ संप‌वण्यासाठी ते उत्सुक आहेत. भारतीय संघाचा अ-गटात समावेश करण्यात आला असून त्यांना इंग्लंड, वेल्स आणि कॅनडा या संघांशीही दोन हात करावे लागणार आहेत. प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. २०१८च्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय महिला संघाला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडने त्यांना ६-० अशी धूळ चारली होती. नुकताच झालेल्या महिलांच्या विश्वचषकात भारतीय संघाने चक्क नववे स्थान मिळवले. यापूर्वी २००६च्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय महिलांनी रौप्यपदकावर नाव कोरले होते. त्यानंतर १६ वर्षांपासून त्यांची पदकाची प्रतीक्षा कायम आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in