विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशीही भारताची पदकांची कमाई

भारतीय त्रिकुटाने कोरियावर १७-१५ अशी मात करताना सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत अखेरच्या दिवशीही भारताची पदकांची कमाई
Published on

दक्षिण कोरियामधील चांगवॉन येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताने गुणतालिकेत अग्रस्थान मिळवून स्पर्धेची दिमाखात सांगता केली. अखेरच्या दिवशीसुद्धा भारताने एका सुवर्णासह तीन रौप्यपदकांवर नाव कोरले. भारताने स्पर्धेत तीन सुवर्ण, चार रौप्य आणि एक कांस्य अशी सर्वाधिक आठ पदकांची कमाई केली.

पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात अर्जुन बबुता, शाहू तुषार माने आणि पार्थ मख्खिजा या भारतीय त्रिकुटाने कोरियावर १७-१५ अशी मात करताना सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. कोरिया आणि सर्बिया यांना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. अर्जुन आणि शाहू यांचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्ण ठरले. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात इटलीच्या पाओलो मोना, अॅलिसो टोराची आणि लुका टेस्कोनी यांनी भारतीय संघावर १५-१५ असा विजय मिळवला.

महिलांच्या १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात भारताच्या इलाव्हेनिल वालाविरान, मेहुली घोष आणि रमिता यांनी रौप्यपदक पटकावले. कोरियाच्या कीम, त्सुनो ली आणि देगाँग वॉन यांनी भारतीय त्रिकुटावर १६-१० असे प्रभुत्व मिळवले.

महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताला आणखी एका सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. रिदम सांगवान, युविका तोमर आणि पलक या भारतीय नेमबाजांच्या त्रिकुटाला कोरियाच्या संघाने १०-२ असे सहज नमवले.

logo
marathi.freepressjournal.in