वर्चस्व गाजवण्याचे भारताचे ध्येय; अफगाणिस्तानविरुद्ध आज दुसरा टी-२० सामना

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. इंदूर येथे रंगणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून ही मालिका खिशात घालण्याचे ध्येय भारतीय संघाने आखले आहे.
वर्चस्व गाजवण्याचे भारताचे ध्येय; अफगाणिस्तानविरुद्ध आज दुसरा टी-२० सामना

इंदूर : मोहाली येथील पहिला टी-२० सामना सहजपणे जिंकल्यानंतर आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अफगाणिस्तानवर वर्चस्व गाजवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. इंदूर येथे रंगणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून ही मालिका खिशात घालण्याचे ध्येय भारतीय संघाने आखले आहे.

भारताने पहिला सामना सहा विकेट्सनी विजंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर तसेच अक्षर पटेल यांना अद्याप आपली गुणवत्ता तसेच उपयुक्तता सिद्ध करता आलेली नाही. त्यामुळे सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-२० वर्ल्डकपसाठी संघाची निवड करताना त्यांच्यावर संघ व्यवस्थापनाच्या बारकाईने नजरा असतील. जून महिन्यात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेआधी भारताची ही शेवटची टी-२० मालिका असल्यामुळे त्यांच्यासाठी चमक दाखवण्याची ही अखेरची संधी असेल.

इशान किशनवर भारतीय संघ व्यवस्थापन नाराज असल्याच्या चर्चा असल्यामुळे जितेशने बऱ्यापैकी निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात जितेशने चांगली कामगिरी केली होती. महाराष्ट्राच्या या खेळाडूला ३० धावांच्या पलीकडे फार वेळा मजल मारता आली नाही. त्यामुळे मोठ्या खेळी करून टी-२० संघातील स्थान पक्के करण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल. जितेश सध्या ३० वर्षांचा असल्यामुळे संघातील स्थान कसे निश्चित करायचे, याची कल्पना त्याला असेल.

डावखुरा फलंदाज तिलक वर्मा यानेही वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत अनुक्रमे ३९, ५१ आणि नाबाद ४९ धावांची खेळी करून आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. त्यानंतर तिलक वर्माची फलंदाजी ढेपाळली. पुढील १३ सामन्यांत त्याला फक्त एकदाच अर्धशतकी खेळी साकारता आली. तीन वेळा त्याने २०पेक्षा अधिक तर एकदा ३०पेक्षा जास्त धावा केल्या. त्यामुळे त्याचे संघातील स्थानही डळमळीत झाले आहे. त्यामुळे भविष्यातील भारतीय संघाचा प्रमुख घटक म्हणून तिलककडे पाहिले जात असले तरी तो मिळालेल्या संधीला योग्य न्याय देऊ शकलेला नाही. अनुभवी विराट कोहली जर टी-२० क्रिकेटसाठी उपलब्ध झाला तर तिलक वर्माला अंतिम संघातून डच्चू मिळेल.

दुखापतीमुळे फिरकीपटू अक्षर पटेल वनडे वर्ल्डकपमध्ये खेळू शकला नसला तरी त्याने दुखापतीवर मात करत पुनरागमन केले आहे इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठीही त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असून त्याने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांत चार षटकांत २३ धावा देत २ बळी मिळवले होते. आता आपल्या फिरकीची कमाल दाखवण्यासाठी तो सज्ज झाला आहे. वॉशिंग्टन सुंदरलाही बऱ्याच कालावधीनंतर भारतीय संघात संधी मिळाली, पण त्या संधीचा फायदा उठवण्यात तो अपयशी ठरला. पहिल्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. आता दुसऱ्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असतील.

दुसरीकडे, अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक भारतीय संघाला महागात पडू शकते. युवा रहमनुल्ला गुरबाझ, अझमतुल्ला ओमरझाई तसेच अनुभवी मोहम्मद नबी यांच्यासह अफगाणिस्तानकडे तगडे गोलंदाज आहेत. स्टार फिरकीपटू राशिद खान याच्या अनुपस्थितीत मुजीब उर रहमानने पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in