
बीसीसीआयने रविवारी रात्री मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान भारताच्या नव्या जर्सीचे अनावरण केले. भारतीय संघ सध्या परिधान करत असलेली जर्सीचा रंग नेव्ही ब्लू आहे; मात्र आता भारतीय संघाच्या जर्सीचा रंग निळा होणार आहे. गेल्या विश्वचषकाच्या जर्सीला ‘बिलियन चीअर्स जर्सी’ असे नाव देण्यात आले होते आणि त्याचा पॅटर्न टीम इंडियाच्या चाहत्यांपासून प्रेरित होता. यावेळी बीसीसीआयने ट्विट करून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला लिहिले, “भारतातील सर्व क्रिकेट चाहत्यांनो, ही तुमच्यासाठी आहे. सादर करत आहोत नवीन टी-२०
जर्सी – वन ब्लू जर्सी”.
टीम इंडियाचा अधिकृत कीट पार्टनर एमपीएल स्पोर्ट्स आहे. एमपीएलने नवीन किटचे डिझाइन आणि पॅटर्न बदलला आहे. यावेळी दोन छटा पाहायला मिळाल्या आहेत. तर, बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टमध्ये नवीन जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंचा फोटो शेअर केला. यात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि महिला संघातील सदस्य हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा आणि रेणुका सिंग यांचा समावेश आहे. नवीन जर्सीमधील खांदे आणि बाही गडद निळ्या रंगाचे आहेत आणि उर्वरित भाग हलका निळा आहे. जर्सीच्या डाव्या बाजूला एक लहान डिझाइनदेखील आहे.