
ॲडलेड : एकीकडे भारतात सगळीकडे गुलाबी थंडी पसरायला सुरुवात झालेली असताना ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट संघाची गुलाबी कसोटी लागणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणाऱ्या दुसऱ्या डे-नाईट (दिवसरात्र) कसोटी सामन्याला शुक्रवारपासून ॲडलेड येथे प्रारंभ होणार आहे. या लढतीद्वारे कर्णधार रोहित शर्माही पुनरागमन करणार असून तो नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे एकूणच चाहत्यांना आता दुसऱ्या लढतीचे वेध लागले आहेत.
रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला २९५ धावांनी धूळ चारली. बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत खेळवण्यात येणाऱ्या पाच लढतींच्या या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या कसोटीपूर्वी झालेल्या दोन दिवसीय सराव लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया पंतप्रधान एकादश संघाचा पराभव करून आपण गुलाबी चेंडूच्या आव्हानासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. रोहितसह युवा फलंदाज शुभमन गिलही या सामन्याद्वारे परतणार असल्याने भारताचा संघ पूर्ण ताकदीसह मैदानात उतरण्यास आतुर आहे. मात्र त्यांना ऑस्ट्रेलियाचे गुलाबी कसोटीतील वर्चस्व संपुष्टात आणण्याचे शिवधनुष्य पेलावे लागेल.
जवळपास ४ वर्षांपूर्वी ॲडलेड येथेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूने खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात भारताचा संघ ३६ धावांत गारद झाला होता. त्या पराभवाच्या आठवणी काही चाहत्यांच्या मनात आजही कायम आहेत. भारताने त्यावेळी गुलाबी कसोटी गमावूनही मालिका जिंकली होती. मात्र यंदा भारताला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याकरिता ५ सामन्यांची मालिका ४-० अशा फरकाने जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक लढत भारताच्या दृष्टीने निर्णायक आहे.
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणारा ऑस्ट्रेलियाचा संघही पहिल्या पराभवातून सावरत मालिकेत बरोबरी साधण्यासाठी उत्सुक असेल. ऑस्ट्रेलियाने आजवर १२ डे-नाईट कसोटी सामने खेळले असून त्यांनी फक्त एकच लढत गमावली आहे. जानेवारीत वेस्ट इंडिजने त्यांना नमवले. दुसरीकडे भारताने ४ पैकी ३ डे-नाईट कसोटी भारताने जिंकल्या आहेत. २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच हा पराभव भारताने पत्करला होता. त्यामुळे आताही कांगारूंचे पारडे जड मानले जात आहे. येथे नाणेफेकीचा कौल निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे एकूणच या लढतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
राहुल सलामीला; रोहित मधल्या फळीत खेळणार
कर्णधार रोहितने गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व चर्चांना पूर्णविराम लगावताना के. एल. राहुलच यशस्वी जैस्वालच्या साथीने दुसऱ्या कसोटीत सलामीला येईल, असे सांगितले. त्यामुळे डिसेंबर २०१८ नंतर प्रथमच रोहित कसोटीमध्ये मधल्या फळीत खेळताना दिसेल. राहुल व यशस्वी यांनी पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात २०० धावांची सलामी नोंदवली होती. विशेषत: राहुलने पहिल्या डावात २६, तर दुसऱ्या डावात संयमीपणे ७७ धावा करून ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याचा समर्थपणे मुकाबला केला. त्यामुळे राहुलकडून पुन्हा तशीच कामगिरी अपेक्षित आहे. “पहिल्या कसोटीत मी राहुल-यशस्वीची फलंदाजी टीव्हीवर पाहिली. त्यांनी दुसऱ्या डावात भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. त्यामुळे हे समीकरण बदलू नये, असा निर्णय संघ व्यवस्थापनाने एकत्रितपणे घेतला आहे,” असे रोहित म्हणाला. त्याशिवाय गिलने सराव लढतीत तिसऱ्या क्रमांकावर अर्धशतक झळकावून छाप पाडली. तर विराट चौथ्या क्रमांकावर पक्का आहे. विराटने ॲडलेडमध्ये कसोटीत ३ शतके झळकावली आहेत. त्यामुळे रोहित पाचव्या अथव्या सहाव्या स्थानी फलंदाजी करेल, असे दिसते. ऋषभ पंत यष्टिरक्षणाची भूमिका बजावेल.
खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज
या कसोटीच्या पहिल्या दोन दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुलाबी चेंडूची कसोटी पाचव्या दिवसापर्यंत क्वचितच लांबते. त्यामुळे यावेळी पावसाने खोळंबा केल्यास ही लढत पाचव्या दिवसापर्यंत रंगू शकते.
ॲडलेडचे खेळपट्टी निर्देशक डेमियन हॉग यांनी खेळपट्टी तिसऱ्या दिवसापासून फिरकीपटूंना पोषक असेल, असे सांगितले. ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार दुपारी २.३० वाजता ही लढत सुरू होणार असून सायंकाळी ५ ते ७ म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळेस वेगवान गोलंदाज घातक ठरू शकतात. खेळपट्टीवर ६ मिमी उंचीचे गवत ठेवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियात झालेल्या १२ डे-नाईट कसोटीपैंकी १० वेळा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजी घेतली आहे आणि पुढे लढतही जिंकली आहे. विशेषत: ॲडलेडमधील सातही डे-नाईट कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकलेल्या आहेत.
हेझलवूडच्या जागी बोलंडला संधी
मध्यमगती गोलंदाज जोश हेझलवूड दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी स्कॉट बोलंडला संधी देण्यात आली आहे. हा एकमेव बदल ऑस्ट्रेलियाच्या अंतिम ११ खेळाडूंत करण्यात आला आहे. मिचेल स्टार्क व कमिन्स या अनुभवी जोडीला कामगिरी उंचावण्याची गरज आहे. फिरकीपटू नॅथन लायनकडेही लक्ष असेल. फलंदाजांचे अपयश कांगारूंसाठी चिंतेचे कारण आहे. विशेषत: स्टीव्ह स्मिथने जून २०२३ पासून कसोटीत एकही शतक झळकावलेले नाही. मार्नस लबूशेन, उस्मान ख्वाजा व ट्रेव्हिस हेड असे फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मिचेल मार्शने संघातील स्थान टिकवले आहे.
बुमरापासून कांगारूंना धोका; अश्विन-जडेजाचे काय?
पहिल्या कसोटीत सामनावीर ठरलेल्या बुमराच्या तिखट माऱ्यापासून कांगारूंना पुन्हा वाचावे लागेल. बुमराला वर्षातील ५० कसोटी बळींचा टप्पा गाठण्यासाठी फक्त एका विकेटची गरज आहे. त्याच्यासह मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा वेगवान माऱ्याची धुरा वाहतील. फिरकीपटू म्हणून पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदरच्या पारड्यात कौल जाऊ शकतो. त्यामुळे रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा या अनुभवी फिरकीपटूंना प्रतीक्षा करावी लागू शकते. रोहितनेही याकडे इशारा दिला. नितीश रेड्डी अष्टपैलूची भूमिका बजावेल. त्याने फलंदाजीत छाप पाडली होती.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १०८ कसोटी सामन्यांपैकी भारताने ३३, तर ऑस्ट्रेलियाने ४५ लढती जिंकल्या आहेत. २९ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत, तर एक सामना टाय झाला होता.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, नितीश रेड्डी, मोहम्मद सिराज, आकाश दीप, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमरा, अभिमन्यू ईश्वरन.
ऑस्ट्रेलिया (अंतिम ११) : पॅट कमिन्स (कर्णधार), उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लबूशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ॲलेक्स कॅरी, मिचेल मार्श, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलंड, नॅथन लायन.
वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, डीडी स्पोर्ट्स आणि हॉटस्टार ॲप