ॲथलेटिक्ससाठी भारताचा विक्रमी ३० जणांचा चमू! नीरजच्या नेतृत्वाखाली पॅरिस ऑलिम्पिकसाठी लवकरच होणार रवाना

२६ जुलैपासून रंगणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ३० जणांचा समावेश असलेला ट्रॅक अँड फिल्ड ॲथलेटिक्स चमू जाहीर केला आहे. नीरजच्या नेतृत्वाखाली हा चमू पुढील काही दिवसांत पॅरिसला रवाना होईल.
ॲथलेटिक्ससाठी भारताचा विक्रमी ३० जणांचा चमू! नीरजच्या नेतृत्वाखाली पॅरिस ऑलिम्पिकसाठी लवकरच होणार रवाना
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी दिल्ली : २६ जुलैपासून रंगणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारताने ३० जणांचा समावेश असलेला ट्रॅक अँड फिल्ड ॲथलेटिक्स चमू जाहीर केला आहे. नीरजच्या नेतृत्वाखाली हा चमू पुढील काही दिवसांत पॅरिसला रवाना होईल. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघ ॲथलेटिक्समध्ये इतके खेळाडू पाठवणार आहे. २०२१च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे ॲथलेटिक्समध्ये २६ खेळाडू होते.

२६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक रंगणार आहे. या स्पर्धेसाठी ॲथलेटिक्स महासंघाने संघ जाहीर केला आहे. साहजिकच टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राकडून या चमूत सर्वाधिक अपेक्षा आहेत. पॅरिस येथील डायमंड लीगच्या दुसऱ्या टप्प्यात तंदुरुस्तीच्या कारणास्तव नीरज सहभागी झाला नाही. मात्र तो ऑलिम्पिकपर्यंत १०० टक्के तंदुरुस्त असेल. भारतीय ॲथलेटिक्सचे मुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी निवडण्यात आलेले सर्व खेळाडू तंदुरुस्त आहेत, याची खात्रीही दिली.

“भारतीय ॲथलेटिक्स चमूकडून यंदा सर्वांनाच चमकदार कामगिरी अपेक्षित आहे. डी. पी. मनू द्रव्य उत्तेजक चाचणीत दोषी आढलल्याने त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र तरीही भारताचे अन्य ॲथलिट्स छाप पाडतील, याची खात्री आहे,” असे नायर म्हणाले.

भारतीय संघात १८ पुरुष व १२ महिला खेळाडूंचा समावेश आहे. आशियाई विजेता महाराष्ट्राचा अविनाश साबळे, गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर, धावपटू ज्योती याराजी, भारतीय पुरुषांची रिले चौकट यांसारख्या खेळाडूंवरही चाहत्यांचे लक्ष असेल. १ ते ११ ऑगस्टदरम्यान ॲथलेटिक्समधील क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा रंगतील. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके जिंकली होती. यामध्ये नीरजच्या सुवर्णपदकाचाही समावेश होता. यंदा भारताचे खेळाडू पदकांचे दशक गाठतील, हीच आशा तमाम देशवासी बाळगून आहेत.

भारताचा चमू

पुरुष : अविनाश साबळे (३,००० मीटर स्टीपलचेस शर्यत), नीरज चोप्रा, किशोर जेना (भालाफेक), तजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक), प्रवीण चित्रावेल, अबुला अबूबाकर (तिहेरी उडी), आकाशदीप सिंग, विकास सिंग, परमजीत सिंग (२० किमी चालण्याची शर्यत), मोहम्मद अनास, मोहम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तमिलरासन, राजेश रमेश (रिले शर्यत), मिजो चाको, सुरज पन्वार (चालण्याचे मिश्र मॅरेथॉन), सर्वेस कुशारे (उंच उडी), जेस्विन अल्ड्रीन (लांब उडी).

महिला : किरण पहल (४०० मीटर शर्यत), पारुल चौधरी (३ आणि ५ हजार मीटर स्टीपलचेस शर्यत), ज्योती याराजी (१०० मीटर अडथळ्यांची शर्यत), अन्नू राणी (भालाफेक), अभा खटुआ (गोळाफेक), ज्योतिका दांडी, सुभा वेंकटेशन, विथ्या रामराज, पूवम्मा, प्राची (रिलो शर्यत), प्रियांका गोस्वामी (२० किमी चालणे), अंकिता ध्यानी (५००० मीटर धावण्याची शर्यत).

logo
marathi.freepressjournal.in