पार्ल : संजू सॅमसनने (११४ चेंडूंत १०८ धावा) झळकावलेल्या शतकाला अर्शदीप सिंगच्या (३० धावांत ४ बळी) भेदक गोलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे भारताने निर्णायक तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा ७८ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारताने २-१ अशा फरकाने मालिका जिंकली. सॅमसन सामनावीर, तर तीन सामन्यांत सर्वाधिक १० बळी घेणारा अर्शदीप मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना भारताने सॅमसनच्या पहिल्या शतकाच्या बळावर ५० षटकांत ८ बाद २९६ धावांपर्यंत मजल मारली. तिलक वर्मा (५२), रिंकू सिंग (३८) यांनीही उत्तम योगदान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव ४५.५ षटकांत २१८ धावांत आटोपला. टॉनी डी झॉर्झीने ८१ धावांची झुंज दिली. मात्र अर्शदीपने चार, तर आवेश खान, वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून आफ्रिकेला रोखले. भारताने आफ्रिकेत दुसऱ्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. तसेच २०२३ या वर्षात भारताने एकंदर २७वा एकदिवसीय सामना जिंकला.