हर्षित, नितीश यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 'टीम इंडिया'त स्थान; आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रमणदीप, वैशाखला संधी

अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ४ टी-२० सामन्यांसाठीही भारताचा संघ जाहीर केला.
हर्षित, नितीश यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 'टीम इंडिया'त स्थान; आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी रमणदीप, वैशाखला संधी
Published on

मुंबई : वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि मध्यमगती अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांची प्रतिष्ठेच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. २२ नोव्हेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. अजित आगरकरच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय निवड समितीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ४ टी-२० सामन्यांसाठीही भारताचा संघ जाहीर केला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. यानंतर ८ नोव्हेंबरपासून भारताचा संघ आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. येथे उभय संघांत ४ टी-२० सामने खेळवण्यात येतील. सूर्यकुमार यादव त्या दौऱ्यावर भारताचे नेतृत्व करणार आहे. टी- २० मालिकेसाठी विजयकुमार वैशाख व रमणदीप सिंग यांना संधी देण्यात आली आहे. मयांक यादव व शिवम दुबे दुखापतीमुळे निवडीस उपलब्ध नव्हते. तसेच रियान पराग बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार घेत असल्याने तो आफ्रिका दौऱ्यावर जाणार नाही.

कसोटी मालिकेचा विचार करता रोहित पहिल्या लढतीला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे अभिमन्यू ईश्वरनला पर्यायी संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच अक्षर पटेलला डच्चू देण्यात आला आहे. तर कुलदीप यादव स्नायूंच्या दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार नाही.

मोहम्मद शमीचासुद्धा संघात समावेश करण्यात आलेला नाही. प्रसिध कृष्णाला मात्र संघात स्थान लाभले आहे. तसेच के. एल. राहुललासुद्धा संघात कायम ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्य महिनाभरापूर्वीच भारतीय संघ जाहीर करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रात्री १० वाजल्यानंतर बीसीसीआयने संघ जाहीर केले.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमरा (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारताचा टी-२० संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैशाख, आवेश खान, यश दयाल.

logo
marathi.freepressjournal.in