सूर्यकुमारच्या समावेशाबाबत संभ्रम; दुखापतीमुळे IPL च्या सुरुवातीच्या किमान तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता

सूर्यकुमारच्या समावेशाबाबत संभ्रम; दुखापतीमुळे IPL च्या सुरुवातीच्या किमान तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता

आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ २४ तारखेला गुजरात टायटन्सविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे.

मुंबई : भारताचा टी-२० प्रकारातील तारांकित फलंदाज पायाच्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या तीन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) अद्याप तंदुरुस्त प्रमाणपत्र दिलेले नाही. त्यामुळे तो तीन पेक्षा अधिक लढतींना मुकण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही.

आयपीएलच्या १७व्या हंगामाला २२ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ २४ तारखेला गुजरात टायटन्सविरुद्ध सलामीची लढत खेळणार आहे. या लढतीसाठी ३३ वर्षीय सूर्यकुमार मुंबईच्या संघाचा भाग असेल, अशी अपेक्षा होती. मात्र एनसीएने सूर्यकुमार अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तो किमान २-३ लढतींना सहज मुकेल, असे समजते. सोमवारी पत्रकार परिषदेतही प्रशिक्षक मार्क बाऊचर यांना सूर्यकुमारच्या उपलब्धतेविषयी विचारण्यात आले होते. मात्र त्याविषयी पूर्ण माहिती नसल्याचे बाऊचर म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या फक्त ७ एप्रिलपर्यंतच्या सामन्यांचेच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

“मंगळवारी करण्यात आलेल्या तंदुरुस्ती चाचणीनुसार सूर्यकुमार अद्याप १०० टक्के खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. २१ मार्च रोजी त्याची पुढील चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतरच सूर्यकुमारच्या आयपीएलमधील समावेशाबाबत निर्णय घेण्यात येईल,” असे एनसीएच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मुंबईला पहिल्या दोन आठवड्यांत अनुक्रमे गुजरात, हैदराबाद (२७ मार्च), राजस्थान (१ एप्रिल), दिल्ली (७ एप्रिल) यांच्याशी मुकाबला करायचा आहे.

सूर्यकुमार डिसेंबरमध्ये अखेरचा सामना खेळला आहे. आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्याने ५६ चेंडूंत १०० धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. मात्र याच लढतीत सूर्यकुमारला पायाच्या घोट्याची दुखापत झाली. यानंतर जानेवारीत सूर्यकुमारच्या पायावर तसेच स्पोर्ट्स हर्नियावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेला मुकला. सूर्यकुमार सध्या बंगळुरूलाच एनसीएमध्ये तंदुरुस्ती कार्यक्रमात व्यस्त आहे. मध्यंतरी तो हातात काठी घेऊन चालतानाही दिसला होता. जूनमध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने तो लवकरच तंदुरुस्त होऊन आयपीएलमध्ये खेळणे, भारतीय संघाच्या दृष्टीने मोलाचे ठरेल.

बेहरेनडॉर्फ स्पर्धेबाहेर; वूडला संधी

ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज जेसन बेहरेनडॉर्फ दुखापतीमुळे आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकणार आहे. त्याच्या जागी इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज ल्यूक वूडचा मुंबई इंडियन्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आफ्रिकेचा वेगवान शिलेदार जेराल्ड कोएट्झेसुद्धा सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे तो सुरुवातीच्या लढतीला मुकू शकतो. श्रीलंकेचा दिलशान मदुशंका आधीच २-३ सामने खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा संघ खेळाडूंच्या दुखापतींच्या गर्तेत सापडला आहे.

आयपीएलमध्ये यंदा ‘स्मार्ट रिप्ले’ प्रणाली

आयपीएलच्या या हंगामात सीमारेषेजवळील झेल तसेच पायचीतचे निर्णय देताना पंचांना अधिक पारदर्शक व सुस्पष्टता मिळावी, यासाठी स्मार्ट रिप्ले प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. याद्वारे हॉक-आय तसेच दोन रिप्लेमधील फ्रेम अधिक स्पष्ट होतील. तसेच या विभागातील अधिकारी तिसऱ्या पंचांसह बसलेले असतील. जेणेकरून वेळेचीसुद्धा बचत होईल. अनेकदा चुकीचा झेल, अपूर्ण धाव अथवा पायचीतच्या निर्णयामुळे संघाला फटका बसल्याचे यापूर्वी पाहिले गेले आहे. मात्र यासाठी यंदा बीसीसीआयने पाऊल उचलत १५ पंचांचे दोन दिवसीय शिबीर राबवून त्यांना या प्रणालीविषयी माहिती दिली. यापूर्वी इंग्लंडमधील द हंड्रेड लीगमध्ये ‘स्मार्ट रिप्ले’ प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा समालोचन क्षेत्रात

भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू जवळपास १२ वर्षांनी पुन्हा एकदा समालोचन करताना दिसणार आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामात सिद्धू समालोचकाच्या भूमिकेत दिसतील. शेरोशायरी तसेच क्रिकेटविषयी सखोल ज्ञानासाठी ओळखल्या जाणाऱ्या ६० वर्षीय सिद्धू यांनी यापूर्वी १९९९ ते २०१३ पर्यंत सातत्याने समालोचन केले. आयपीएलच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये सिद्धू यांचे समालोचन ऐकण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असायचे.

हसरंगाची निवृत्ती मागे आणि आयसीसीची बंदी

फिरकीपटू वानिंदू हसरंगाचा बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी श्रीलंकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे. २६ वर्षीय हसरंगाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र या मालिकेसाठी त्याने पुन्हा कसोटी खेळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादच्या सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी अनुपलब्ध असेल. हे सर्व सुरू असतानाच आयसीसीने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आल्याचे श्रीलंकन बोर्डाला कळवले. त्यामुळे तो या कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. अशा स्थितीत तो पुन्हा आयपीएलकडे वळण्याची शक्यता आहे.

राहुलला यष्टिरक्षण करण्यास मनाई

भारताचा अनुभवी फलंदाज के. एल. राहुल आयपीएलच्या हंगामासाठी तंदुरुस्त झाला आहे. मात्र एनसीएच्या वैद्यकीच चमूने राहुलला तूर्तात यष्टिरक्षण न करण्याचे सुचवले आहे. त्यामुळे लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार राहुल आयपीएलमध्ये फक्त फलंदाजाच्या भूमिकेत दिसू शकतो. राहुलला यष्टिरक्षणासाठी आवश्यक असलेल्या बैठका मारणे सध्या जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे किमान २-३ आठवडे तरी फक्त फलंदाज म्हणूनच संघात खेळेल. अशा स्थितीत निकोलस पूरन किंवा क्विंडन डीकॉक लखनऊसाठी यष्टिरक्षण करेल.

logo
marathi.freepressjournal.in