भारताचा सूर्यकुमार सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू

आयसीसीने बुधवारी ट्विटरवर याबाबत अधिकृत घोषणा करताना सूर्यकुमारचा उल्लेख ‘भारताच्या मधल्या फळीचा कणा’ असा केला.
भारताचा सूर्यकुमार सलग दुसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटू
Published on

दुबई : भारताचा तडाखेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवची सलग दुसऱ्यांदा आयसीसीच्या वर्षातील सर्वोत्तम पुरुष टी-२० क्रिकेटपटूसाठी निवड झाली आहे. आयसीसीने बुधवारी ट्विटरवर याबाबत अधिकृत घोषणा करताना सूर्यकुमारचा उल्लेख ‘भारताच्या मधल्या फळीचा कणा’ असा केला.

मुंबईच्या ३३ वर्षीय सूर्यकुमारने २०२३ या वर्षात १७ टी-२० सामन्यांत ४८ची सरासरी व १५५च्या स्ट्राईक रेटने तब्बल ७३३ धावा केल्या. यामध्ये दोन शतकांचाही समावेश होता. त्याने झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, न्यूझीलंडचा मार्क चॅपमन आणि युगांडाचा अल्पेश रामजानी यांच्यावर सरशी साधली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत सूर्यकुमारने भारताचे नेतृत्वही केले. त्याच्यावर सध्या शस्त्रक्रिया करण्यात आली असून एप्रिल महिन्यात आयपीएलमध्येच तो पुनरागमन करण्याची शक्यता आहे. सूर्यकुमारने २०२२मध्येसुद्धा वर्षातील सर्वोत्तम टी-२० क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला होता. सूर्यकुमारने आयसीसीचे या पुरस्कारासाठी आभार मानताना लवकरच मैदानात परतण्याचे आश्वासन दिले.

महिलांमध्ये वेस्ट इंडिजच्या हीली मॅथ्यूजने हा पुरस्कार पटकावला. तसेच वर्षातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या रचिन रवींद्रने बाजी मारली. भारताचा यशस्वी जैस्वालही या शर्यतीत होता. महिलांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या फोबे लिचफील्डने सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटूचा बहुमान मिळवला.

logo
marathi.freepressjournal.in