भारताचे लक्ष्य साध्य! पी. व्ही. सिंधू आणि सेन यांना एकेरीचे जेतेपद

भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यांनी रविवारी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.
भारताचे लक्ष्य साध्य! पी. व्ही. सिंधू आणि सेन यांना एकेरीचे जेतेपद
Published on

लखनऊ : भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि अव्वल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन यांनी रविवारी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकलेली भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधूने रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चीनच्या वू लुओ यू हिला २१-१४, २१-१६ असे सरळ गेममध्ये पराभवाचा चेहरा दाखवत तिसऱ्यांदा जेतेपदाचा मुकुट पटकावला. यापूर्वी तिने २०१७ आणि २०२२ मध्ये विजेतेपद पटकावले होते.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहला २१-६, २१-७ अशी धूळ चारत जेतेपदाचा चषक उंचावला.

पहिल्या गेममध्ये सिंधू ८-५ अशी आघाडीवर होती. त्यानंतर वूने काहीसा प्रतिकार केला. परंतु तरीही सिंधूने ११-९ अशी दोन गुणांची आघाडी मिळवली. त्यानंतर सिंधूने टॉप गिअर टाकत सामना १५-१० असा फिरवला. त्यानंतर २१-१४ असा सामना खिशात घातला. दुसऱ्या सामन्यात सिंधूने ३-० अशी चांगली आघाडी घेतली. परंतु वूने पुनरागमन करत सामन्यात १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर अप्रतिम फटका मारत ११-१० अशी आघाडी घेतली. मात्र येथे सिंधूने शानदार पुनरागमन करत सेट आपल्या बाजूने वळवला.

पहिल्या गेममध्ये लक्ष्यने ८-० अशी शानदार सुरुवात केली. त्यानंतर दोन गुण मिळवत तेहने पुनरागमन केले. परंतु लक्ष्यच्या आक्रमक खेळापुढे त्याचा टिकाव लागला नाही. मध्यंतरानंतरही भारतीय खेळाडूने १० पैकी ९ गुण जिंकून गेम आपल्या बाजूने वळवला. दुसऱ्या गेममध्येही भारतीय खेळाडूने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवत गेमसह सामना आपल्या नावे केला आहे.

महिला दुहेरीत ट्रिसा-गायत्री यांना विजेतेपद

ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या महिला दुहेरीच्या जोडीने चीनच्या बाओ ली जिंग आणि ली कियान यांचा २१-१८, २१-११ असा पराभव करून पहिले सुपर ३०० स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

या विजयामुळे सुपर ३०० स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी ट्रिसा आणि गायत्री ही पहिली भारतीय महिला दुहेरी जोडी ठरली आहे. २०२२ मध्ये या जोडीला राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.

पुरुष दुहेरीत पृथ्वी, साई यांनी मारली बाजी

पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक के. जोडीने चीनच्या हुआंग डी आणि लिऊ यांग यांच्यावर १४-२१, २१-१९ आणि १७-२१ अशी ७१ मिनिटांच्या लढतीत बाजी मारली. पहिला सामना जिंकत भारतीय जोडीने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात मात्र चीनच्या जोडीने पुनरागमन केले.

मिश्र दुहेरीत जेतेपदाला हुलकावणी

मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पाचव्या मानांकित तनिषा क्रास्टो आणि ध्रुव कपिला यांनी दमदार सुरुवात केली. परंतु त्यांना त्यात सातत्य राखता आले नाही. थायलंडच्या डेचापोल पुवारानुक्रोह आणि सुपिसारा पेवसांप या सहाव्या मानांकित जोडीने भारतीय जोडीचा २१-१८, १४-२१, ८-२१ असा पराभव केला.

logo
marathi.freepressjournal.in