बेल्जियमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा चित्तथरारक विजय

दोन गोलच्या बळावर ३-३ अशी बरोबरी साधत हा सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला
 बेल्जियमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचा चित्तथरारक विजय
Published on

गोलरक्षक पीआर श्रीजेशने शूटआऊटमधील पेनल्टी स्ट्रोक अडविल्यामुळे भारताने ‘एफआयएच’ प्रो हॉकी लीगमधील बेल्जियमविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ५-४ असा चित्तथरारक विजय मिळविला.

निर्धारित वेळेतील आठ मिनिटे शिल्लक असताना भारतीय संघ १-३ असा पिछाडीवर होता; परंतु दोन गोलच्या बळावर ३-३ अशी बरोबरी साधत हा सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला. यातील बेल्जियमच्या अ‍ॅलेक्झांडर हेंड्रिक्सचा तिसरा प्रयत्न श्रीजेशने निष्फळ ठरविला. त्यांनतर बेल्जियमने ४-४ अशी बरोबरी साधली; परंतु अखेरच्या प्रयत्नात आकाशदीपने गोल डागत भारताला ५-४ अशी आघाडी मिळवून दिली. याशिवाय अखेरच्या सत्रात श्रीजेशला दोन गोलसुद्धा वाचविण्यात यश आले. सामन्यातील पहिला गोल भारताच्या शमशेर सिंगने दुसऱ्या सत्रात १८व्या मिनिटाला केला. मग बेल्जियमच्या केड्रिक चार्लियरने २१ व्या मिनिटाला बरोबरी साधली. तिसऱ्या सत्रात सिमॉन गाँगनार्डने डागलेल्या गाेलमुळे बेल्जियमला आघाडी मिळाली. चौथ्या सत्रात निकोलस डी केर्पेलने ५१व्या मिनिटाला संघाची आघाडी ३-१ अशी वाढवली; परंतु ५१व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंग आणि ५७व्या मिनिटाला जर्मनप्रीत सिंगच्या गोलमुळे भारताला बरोबरी साधता आली.

logo
marathi.freepressjournal.in