भारताचा श्रीलंका दौरा! नायर, डस्काटे सहाय्यक प्रशिक्षक?

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी अभिषेक नायर आणि रायन टेन डस्काटे यांचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सहाय्यकांमध्ये समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे.
भारताचा श्रीलंका दौरा! नायर, डस्काटे सहाय्यक प्रशिक्षक?
Published on

मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी अभिषेक नायर आणि रायन टेन डस्काटे यांचा नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सहाय्यकांमध्ये समावेश केला जाण्याची दाट शक्यता आहे. २६ जुलैपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.

भारताचा माजी अष्टपैलू नायर आणि नेदरलँड्सचा माजी अष्टपैलू टेन डस्काटे यांनी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघात गंभीरसह काम केले आहे. गंभीर या संघाचा मार्गदर्शक होता, तर नायर व डस्काटे यांनी साहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली होती. त्यामुळे गंभीरनेच या दोघांचे नाव ‘बीसीसीआय’ला सुचवल्याची माहिती आहे.

मुंबईचा माजी कर्णधार नायरने खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर वैयक्तिक प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून भारतीय क्रिकेट वर्तुळात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिनेश कार्तिक आणि रिंकू सिंह यांच्या यशात नायरचे मोठे योगदान आहे. तसेच कोलकाता नाइट रायडर्सच्या अकादमीतही त्याने युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे त्याला आपल्या सहाय्यक प्रशिक्षकांमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी गंभीर उत्सुक आहे.

तसेच डस्काटेचेही गंभीरने बरेच कौतुक केले आहे. गंभीर पूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार होता आणि त्यावेळी डस्काटेचा संघात समावेश होता. डस्काटेला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले नाही, तरी तो कधीही तक्रार करायचा नाही किंवा तोंड पाडून बसायचा नाही. तो कायम अन्य खेळाडूंना प्रोत्साहन देत राहायचा अशा शब्दांत गंभीरने डस्काटेचे कौतुक केले होते. डस्काटे सध्या अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेटमध्ये (एमएलसी) एलए नाइट रायडर्स संघाला मार्गदर्शन करत आहे. भारतीय संघाच्या नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे समजते.

logo
marathi.freepressjournal.in