भारताचा पाकिस्तानवर विजय;स्मृती मानधनची आक्रमक खेळी

विजयासाठी शंभर धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी ६१ धावांची सलामी
भारताचा पाकिस्तानवर विजय;स्मृती मानधनची आक्रमक खेळी

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी भारताने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी पराभव करत आपला पहिला विजय साजरा केला. भारताने पाकिस्तानचे शंभर धावांचे माफक आव्हान ११.४ षटकात दोन फलंदाजांच्या मोबदल्यात साध्य केले. भारताकडून स्मृती मानधनाने ४२ चेंडूत नाबाद ६३ धावांची आक्रमक खेळी केली. तिने चौकार मारत विजय साकारला. गोलंदाजीत स्नेह राणा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान, सामन्यात दोन वेळा पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामन्याची षटके कमी करून सामना प्रत्येकी १८षटकांचा खेळविण्यात आला.

विजयासाठी शंभर धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी ६१ धावांची सलामी दिली. स्मृती मानधनाने षटकार खेचत आपले अर्धशतक साजरे केले.

शेफाली पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाद झाली. तुबा हसनच्या गोलंदाजीवर उडालेला तिचा झेल मुनीबा अलीने टिपला. त्यानंतर सभ्भीनेनी मेघनाने स्मृतीला शानदार साथ देत भारताला १० षटकात ९२ धावांपर्यंत नेऊन पोहोचविले. भारताला विजयासाठी सहा धावांची आवश्यकता असताना मेघनाला ओमैमा सोहलने १४ धावांवर त्रिफळाचीत केले. नंतर स्मृती आणि जेमिमाह रॉड्रिग्ज यांनी भारताला विजय मिळवून दिला.

त्याआधी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मेघना सिंहने दुसऱ्याच षटकात इराम जावेदला यास्तिका भाटियाच्या हाती झेल देण्यास भाग पाडून शून्यावर परत पाठविले. त्यावेळी पाकिस्तानचेही खाते उघडले नव्हते. पाकिस्तानची कर्णधार बिसमाह मारूफ आणि मुनीबा अली यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचत डाव सावरला. मात्र स्नेह राणाने आठव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बिसमाह मारूफ (१९ चेंडूंत १७) आणि मुनीबा अली (३० चेंडूंत ३२) यांना पाठोपाठ बाद करत पाकिस्तानची अवस्था ९ षटकांत ३ बाद ५१ अशी केली.

त्यानंतर पाकिस्तानी फलंदाजांना डावाला आकार देण्यात अपयश आले. ओमैमा सोहेल आणि आयेशा नसीम या दोघींनी प्रत्येकी दहा धावा केल्या. आयेशा बाराव्या, तर आमैमा पंधराव्या षटकात बाद झाली. आलिया रियाझ सतराव्या षटकात १८ धावांवर धावबाद झाली. याच षटकात सहाव्या चेंडूवर फातिमा सारा ८ धावांवर बाद झाली.

दियाना बेगला भोपळाही फोडता आला नाही. तुबा हसनला एक धाव काढता आली. कैनात इम्तियाज अठराव्या षटकात दोन धावा करून बाद झाली. राधा यादवने कैनातचा त्रिफळा उडवत पाकिस्तानला ९९ धावांवर गुंडाळले. भारताकडून स्नेह राणा, राधा यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पाकिस्तानकडून मुनीबा अलीने सर्वाधिक ३० चेंडूत ३२ धावा केल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in