नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या 'या' खेळाडूला सुर्वणपदक

अझरबैजानच्या गबाला येथे २०१६च्या ज्युनियर वर्ल्डकपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते.
 नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या 'या' खेळाडूला सुर्वणपदक

भारताच्या अर्जुन बाबुताने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत सोमवारी पुरुषांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या अमेरिकेच्या लुकास कोझेनिस्कीला १७-९ असे पराभूत करत सुर्वणपदक पटकाविले. यामुळे पदकतालिकेत भारताचे खाते उघडले गेले. अर्जुन ६३०.५ गुणांसह पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिला होता. भारताचा पार्थ माखिजा २५८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला.

वरिष्ठ संघासह अर्जुनचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. अझरबैजानच्या गबाला येथे २०१६च्या ज्युनियर वर्ल्डकपमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. पंजाबचा २३ वर्षीय अर्जुन २०१६ पासून भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. याआधी, त्याने रँकिंग फेरीत २६१.१ गुणांसह अव्वल स्थान पटकावून सुवर्णपदकाच्या सामन्यात मजल मारली होती.

कोझेन्स्कीने २६०.४ गुणांसह सुवर्णपदक लढतीत प्रवेश केला होता. पात्रता फेरीत अव्वल राहिलेल्या इस्रायलच्या ३३ वर्षीय सर्गेई रिक्टरने २५९.९ गुणांसह कांस्यपदक जिंकले. या स्पर्धेत सहभागी होणारा आणखी एक भारतीय पार्थ माखिजा २५८.१ गुणांसह चौथ्या स्थानावर राहिला. रविवारी त्याने चमकदार कामगिरी करत पाचव्या स्थानासह क्रमवारीत सामन्यात स्थान मिळविले होते.

अंतिम फेरीत अर्जुनने कोझेन्स्कीला कोणतीही संधी दिली नाही आणि एका शॉटच्या सात मालिकेनंतर त्याने १०-४ अशी आघाडी घेतली. प्रत्येक मालिकेतील विजेत्याला दोन गुण मिळतात आणि बरोबरी झाल्यास गुण वितरित केले जातात. जो नेमबाज प्रथम १६ गुण मिळवतो त्याला विजेता घोषित केले जाते.

अर्जुनने आघाडी घेऊनही अमेरिकन खेळाडूने हार मानली नाही. अर्जुनने निर्णायक प्रसंगी १० हून अधिक गुण मिळविले आणि सुवर्ण पदकासह स्पर्धेत भारताचे पदक खाते उघडले.

दरम्यान, महिलांच्या एअर रायफलमध्ये मेहुली घोषने ६२८.७ गुण नोंदविले. ती ०.१ गुणांनी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करण्यात अपयशी ठरली. पुरुषांच्या एअर पिस्तूलमध्ये नवीन (५८७), सागर डांगी (५८२) आणि शिवा नरवाल (५८०) यांनी मंगळवारी होणाऱ्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

तसेच महिलांच्या एअर पिस्तूलमध्ये युविका तोमरने दुसऱ्या टप्प्यात ५७६ धावा केल्या, तर पलक घुलिया आणि रिदम सांगवान (५७३) यांची संधी अवघ्या एका गुणाने गमावली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in