
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी दहाव्या दिवशी भारताच्या संदीप कुमारने पुरुषांच्या १० हजार मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक मिळविले. त्याने ३८:४२.३३ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. कॅनडाच्या इव्हान्सने ३८.३७.३६ मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक पटकाविले. दुसऱ्या स्थानावरील डिक्लान टिंगे याने ३८ मिनिटे ४२:३३ सेकंदात अंतर कापून रौप्यपदक जिंकले.
२०१५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत संदीपने ५० किलोमीटर शर्यतीत सहभाग घेतला. रिओ ऑलिम्पिक २०१६ च्या स्पर्धेत तो ३५वा आला. टोकियो ऑलिम्पिक २०२०च्या स्पर्धेत संदीपने २० किलोमीटर शर्यतीत २३वे स्थान मिळविले होते. ५० कि.मी. व २० कि.मी. चालण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत.
या स्पर्धेतील आणखी एक भारतीय खेळाडू अमित खत्री ४३:०४:९७ या वेळेसह नवव्या स्थानावर राहिला. भारताची महिला अॅथलीट प्रियांका गोस्वामीने शनिवारी याच स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. तिने ४३.३८ मिनिटांत १० हजार मीटर अंतर चालत हे पदक जिंकले होते.