विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत

सर्व खेळाडूंना सरावाची संधी मिळावी यासाठी काही भारतीय खेळाडू लिसेस्टरशायरच्या संघाकडून खेळले
विराट कोहली पुन्हा फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत
Published on

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी खेळविण्यात आलेला चार दिवसांचा सराव सामना अनिर्णीत राहिला. लिसेस्टरशायर क्रिकेट क्लब आणि टीम इंडिया यांच्यात हा सराव सामना झाला. विराट कोहलीने दोन्ही डावांमध्ये दमदार खेळी करत फॉर्ममध्ये परतल्याचे संकेत दिले आहेत. सर्व खेळाडूंना सरावाची संधी मिळावी यासाठी काही भारतीय खेळाडू लिसेस्टरशायरच्या संघाकडून खेळले.

सामन्याच्या चौथ्या दिवशी लिसेस्टरशायरला विजयासाठी ३६७ धावा करायच्या होत्या. दिवसाचा खेळ संपेपर्यंत त्यांना चार बाद २१९ धावांपर्यंत मजल मारता आली. ६६ षट्कांनंतर दोन्ही कर्णधारांनी सामना बरोबरीत सोडण्यास अनुकूलता दर्शविली. भारताकडून दुसऱ्या डावात माजी कर्णधार विराट कोहलीने ६७ धावा केल्या. श्रेयस अय्यरने ६२ आणि रवींद्र जडेजाने नाबाद ५६ धावा केल्या. पुजारा लिसेस्टरशायर संघात होता; पण त्याने सरावासाठी भारतीय संघाकडूनही फलंदाजी केली. शुभमन गिल भारताच्या संघात होता; पण त्याने दुसऱ्या डावात लिसेस्टरशायरसाठीदेखील सलामी दिली. दुसऱ्या डावात लिसेस्टरशायरकडून शुभमन गिलने सर्वाधिक ६२ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने दोन बळी टिपले. गिलने ७७ चेंडूत ६२ धावा केल्या. त्याला अश्विनने त्रिफळाचित केले. कोविड-१९मुळे अश्विन या सामन्यात खेळत नव्हता; पण शेवटच्या दिवशी त्याला सरावाची संधी देण्यात आली होती.

भारताने पहिल्या डावात आठ बाद २४६ धावा केल्या होत्या. यानंतर लिसेस्टरशायरचा पहिला डाव २४४ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर भारताने दुसरा डाव सात बाद ३६४ धावांवर घोषित करून लिसेस्टरशायरला विजयासाठी ३६७ धावांचे लक्ष्य दिले.

सराव सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यामुळे एजबस्टन कसोटीमध्ये दोन्ही संघांची चांगली जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे. एजबस्टनमध्ये १ ते ५ जुलै दरम्यान पाचवा कसोटी सामना होणार आहे. भारतीय संघ गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. चार कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघ २-१ ने पुढे होता. कोरोनामुळे पाचवा सामना होऊ शकला नव्हता.

logo
marathi.freepressjournal.in