इन्तेहां हो गयी इतांजार की...

मुंबईतील क्रिकेटच्या दृष्टीने ‘ये नशा, ये खुशी अब ना कम हो कभी...’ असे वाटण्याजोगेच दिवस परतले आहेत
इन्तेहां हो गयी इतांजार की...

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबई संघाने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर अखेर धडाक्यात प्रवेश केला. आता विजेतेपदाच्या चषकापासून मुंबई केवळ एक पाऊल दूर आहे. मुंबई यंदा हा चषक पटकविण्यात यशस्वी झाल्यास हे मुंबईचे ४२ वे विक्रमी अजिंक्यपद ठरेल. उपविजेतेपद तर पक्के झालेलेच आहे. मुंबईतील क्रिकेटच्या दृष्टीने ‘ये नशा, ये खुशी अब ना कम हो कभी...’ असे वाटण्याजोगेच दिवस परतले आहेत. मुंबईचे रणजी हंगामांमधील सोनेरी पर्व परतण्याचेच हे संकेतच आहेत, खरोखरच! याबद्दल सर्वांनीच मुंबई संघाचे अभिनंदन केले पाहिजे आणि मुंबईला अंतिम फेरीत ‘यशस्वी भव’ अशा शुभेच्छा दिल्या पाहिजेत.

मुंबई अंतिम फेरीत जाणार, हे वास्तविक उपांत्य सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारीच निश्चित झाले होते. मुंबईने उत्तर प्रदेश संघाचा डाव १८० धावांत संपुष्टात आणून पहिल्या डावात २१३ धावांची आघाडी घेतली, तेव्हाच किमान पहिल्या डावाच्या आघाडीवरच मुंबईचे अंतिम फेरीतील स्थान पक्के झाले होते.

मुंबईची वाटचाल यशोशिखराकडे चाललेली असतानाच तिसऱ्या दिवसाच्या खेळात एक नाट्यपूर्ण प्रकार घडला. इतिहासच घडला, म्हणा ना! पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला आपले खाते उघडण्यासाठी चक्क ५३ चेंडूंची वाट पाहावी लागली. ‘इम्तेहां हो गयी इंतजार की...’ असेच झाले, जणू. तब्बल ५३ चेंडू खेळून त्याला एकही धाव काढता आली नाही. एखादा सामना अनिर्णीत ठेवण्यासाठी ज्या प्रकारे फलंदाजी करायची असते, अगदी तशाच प्रकारे फलंदाजी करताना जैस्वाल दिसला. धाव घेण्यासाठी फटका मारायचाच नाही, अशी मानसिकता ठेवूनच तो मैदानात उतरला होता की काय ते तोच जाणे.

संघातील इतर सहकारी खेळाडूंनी त्यावेळी जैस्वालच्या संथ खेळीची गमतीने टाळ्या वाजवत मजा घेतली असेल किंवा टी-२० किंवा आयपीएलला चटावलेल्या प्रेक्षकांनी त्याची हुर्यो देखील उडविली असेल. कारण जैस्वालचा हा बचावात्मक पवित्रा त्याने रणजी करंडक स्पर्धेत केलेल्या चमकदार फलंदाजीला साजेसा बिलकूल नव्हता. त्याने याच सामन्यात पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. २२७ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या डावात यशस्वीला असे काय झाले की त्याने कूर्मगतीचा कहर करावा? दुसऱ्या डावात यशस्वी ५३ चेंडूपर्यंत शून्यावर स्थिरावून राहिलेला असताना दुसऱ्या बाजूने कर्णधार पृथ्वी शॉने कमालीची आक्रमक फलंदाजी केली. ‘फिर वजह क्या हुयी इंतजार की...!’ मुंबईला मिळालेल्या ६६ धावांच्या सलामीत एकट्या शॉच्या ६४ धावा होत्या. आता बोला! ७१ चेंडूत ६४ धावा करुन शॉ बाद झाल्यानंतर अखेर जैस्वाल ५४ व्या चेंडूवर चौकार मारून आपले खाते उघडण्यात ‘यशस्वी’ झाला. त्याने मग चौकार मारताच शतक पूर्ण झाल्याच्या आविर्भावात मजेदार रितीने बॅट उंचावून सेलिब्रेशन केले. जैस्वालच्या या सेलिब्रेशनमध्ये अन्य सहकारी खेळाडूही टाळ्या वाजवत सहभागी झाले. काहींनी तर उभे राहूनही अभिवादन केले. जैस्वालही मैदानातून सर्वांना बॅट दाखविताना दिसला. सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जैस्वाल ११४ चेंडूत ३५ धावा करून नाबाद राहिला होता. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३९३ धावा केल्या होत्या. यात यशस्वीच्या शतकाचा मोठा वाटा होता. त्याच्याशिवाय हार्दिक तोमरनेही ११५ धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मुंबई संघाने १ गडी गमावून १३३ धावा केल्या होत्या आणि पहिल्या डावातील २१३ धावांच्या आघाडीसह मुंबईची एकूण आघाडी ३४६ धावांची झाली होती. ५३ चेंडूपर्यंत खातेही उघडू न शकलेल्या जैस्वालने पुढील ६१ चेंडूत ३५ धावा केल्या होत्या. नंतर चौथ्या दिवशी त्याने या खेळीचे शतकात (३७२ चेंडूंत १८१) रुपांतर केले. जैस्वाल हा रणजी ट्रॉफीच्या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणारा मुंबईचा आठवा फलंदाज बनला. सामन्याच्या पाचव्या दिवशी तर तो सामनावीर ठरला. मात्र सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जैस्वालने खेळलेल्या अनपेक्षित संथ खेळीचे अनेकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक असले, तरी या खेळीकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहायला हवे.

मुंबईला पहिल्या डावात २१३ धावांची मोठी आघाडी मिळाली होती; पण दुसऱ्या डावात उत्तरप्रदेश कमी धावांवर मुंबईचा दुसरा डाव संपुष्टात आणून विजयासाठी उपलब्ध झालेले लक्ष्य साध्य करत अंतिम फेरीत धडक मारण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. कारण सामन्याचे दोन दिवस शिल्लक होते. न्यूझीलंडने पहिल्या डावात ५५३ धावा करूनही आणि १४ धावांची आघाडी घेऊनही इंग्लंडने नॉटिंगहॅममधील कसोटी सामना पाच गडी राखून जिंकल्याचे उदाहरणही ताजेच होते. म्हणूनच आक्रमण आणि बचाव ही रणनीती दोन्ही खेळाडूंनी अवलंबिण्याऐवजी खेळपट्टीचा अंदाज येईपर्यंत एकाने पूर्णतः आक्रमक आणि दुसऱ्याने संपूर्णतः बचावात्मक पवित्रा घेण्याची रणनीती आखण्यात आली असावी, कदाचित. जैस्वालचा हा बचावात्मक पवित्रा एकट्याचा निर्णय असू शकत नाही, असे समजण्यास मोठा वाव आहे. कारण जर खेळपट्टीत दम असेल असे म्हणावे तर मग दुसऱ्या बाजूने शॉ शानदार फलंदाजी कशी काय करू शकला? एक मात्र खरे की जैस्वालच्या वाट्याला आलेले बहुतांश चेंडू हे ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारे होते आणि त्या चेडूंच्या वाट्याला न जाणेच सूज्ञपणाचे ठरणार होते. जैस्वालचा पवित्रा पाहून त्याच्या संयमाची गोलंदाजांनीही एक प्रकारे कसोटीच पाहिली म्हणायची. या लढाईत मात्र जैस्वाल गोलंदाजांना पुरुन उरला, असेच म्हणावे लागेल. एखादा सामना अनिर्णीत कसा राखायचा याचा धडाही जैस्वालने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना अप्रत्यक्षपणे दिला, असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही, खचितच.

काहीही असो. शेवटी रणनीती वैयक्तिक पातळीवर असो की सांघिक, जय-पराजयावरच तिची यशस्विता उजळून निघत असते. जय मिळाला की कोणी काही बोलत नाही. पराभव झाला की अनोख्या डावपेचांचा भलताच बोभाटा होत असतो. आता मुंबईला अंतिम फेरीत धडक मारण्यात मुंबई यशस्वी झाल्याने जैस्वालची ही अफलातून खेळी विस्मरणात जाईल. अशा खेळीची कोणी भविष्यात पुनरावृत्ती केली तर मात्र जैस्वालची हटकून आठवण येईल. चेतेश्वर पुजाराची आली तशी. पुजारालाही २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात खाते उघडण्यासाठी तब्बल ५३ चेंडू आणि ८० मिनिटे खेळावे लागले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील या विलक्षण विक्रमाची जैस्वालने बरोबरी साधली. १९९४ मध्ये श्रीलंकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात आर. चव्हाण या फलंदाजाला पहिली धाव काढण्यासाठी ५७ चेंडू खेळावे लागले होते. शिवाय, इंग्लंडच्या जे. मरेने १९६३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुध्द सिडनी कसोटी सामन्यात ८० चेंडू खेळल्यानंतर पहिली धाव घेतली होती.

इतिहासाचा धुंडाळा घेतल्यास १८८८ मध्ये मँचेस्टर येथे ऑस्ट्रेलियन विरुद्ध नॉर्थ सामन्यात ८६ धावांच्या एका भागीदारीत ए. सी. बॅनरमन या फलंदाजाने अवघ्या चार धावा केल्याची माहिती मिळते. एकट्या मॅकडोनेल या फलंदाजाचा या भागीदारीत ९५.३५ टक्के इतका वाटा होता. रणजी उपांत्य सामन्यात शॉ चा वाटा ९६.९७ टक्के इतका होता. पृथ्वीतलावरील क्रिकेटच्या या विलक्षण आकडेवारीत शॉ बादशहा ठरला, निश्चितच. आता जैस्वालने खाते उघडण्याची जशी प्रतीक्षा लागून राहिली होती, तशीच उत्कंठा लागून राहिली आहे ती मुंबई बादशहा ठरण्याची! मुंबई संघाने पुन्हा रणजी करंडक उंचावण्याची! यशस्वी भव!!

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in