आंतर-कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा : ठाणे महानगरपालिका सलग दुसऱ्यांदा अजिंक्य!

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात झालेल्या निर्णायक लढतीत ठाणे महापालिकेच्या भेदक माऱ्यासमोर डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. अतिश गावंडने १२ धावांत तीन, शशिकांत कदम, नंदन कामत आणि सौद मंसूरीने प्रत्येकी दोन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांना २८.५ षटकांत ८० धावांत गुंडाळले.
आंतर-कार्यालयीन क्रिकेट स्पर्धा : ठाणे महानगरपालिका सलग दुसऱ्यांदा अजिंक्य!

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस संघाचा आठ गडी राखून दणदणीत पराभव करत ४८व्या ठाणेवैभव आंतर-कार्यालयीन वासंतिक क्रिकेट स्पर्धेत ब-गटाचे सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद कायम राखले. प्रतिस्पर्धी संघाला ८० धावांत गुंडाळल्यावर ठाणे महापालिकेने दोन गड्यांच्या मोबदल्यात ८१ धावांसह विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात झालेल्या निर्णायक लढतीत ठाणे महापालिकेच्या भेदक माऱ्यासमोर डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेसचे फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकले नाहीत. अतिश गावंडने १२ धावांत तीन, शशिकांत कदम, नंदन कामत आणि सौद मंसूरीने प्रत्येकी दोन गडी बाद करत प्रतिस्पर्ध्यांना २८.५ षटकांत ८० धावांत गुंडाळले. अनुराग यादवने २६, केतन खरातने नाबाद १६ आणि प्रदीप शर्माने १५ धावांचे योगदान दिले.

लक्ष्याचा पाठलाग करताना ठाणे महापालिकेची खराब सुरुवात झाली. धावांचे खाते उघडलेले नसताना आशुतोष घांग्रेने अनुभवी जयदीप परदेशीच्या दांड्या गुल करत गतविजेत्याना धक्का दिला. पण या धक्क्यातून लगेचच सावरून घेत विकी पाटीलने सौरभ आंब्रेने दुसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी करत १६.४ षटकांत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विकी पाटीलने नाबाद ३७ आणि सौरभ आंब्रेने ३६ धावांची खेळी केली. या डावात आशुतोष घांग्रे आणि चिन्मय कदमने एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

डब्ल्यूएनएस ग्लोबल सर्व्हिसेस : २८.५ षटकांत सर्व बाद ८० (अनुराग यादव २६, केतन खरात नाबाद १६; अतिश गावंड ३/१२, नंदन कामत २/१२) पराभूत वि. ठाणे महापालिका : १६.४ षटकांत २ बाद ८१ (विकी पाटील नाबाद ३७, सौरभ आंब्रे ३६; आशुतोष घांग्रे १/२५, चिन्मय कदम १/१०)

logo
marathi.freepressjournal.in