मुंबई : वांद्रे येथील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या मुले आणि मुलींच्या संघांनी आंतरशालेय खो-खो स्पर्धेत विजेतेपद पटकावत दुहेरी धडाका केला. दादर येथील अमर हिंद मंडळ, अमर वाडी, गोखले रोड येथे झालेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये परळच्या सोशल सर्व्हिस लिगचा, तर मुलींमध्ये सरस्वती विद्यामंदिरचा पराभव झाला.
मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात महात्मा गांधी विद्यामंदिरने परेलच्या सोशल सर्व्हिस लीग संघाचा १८-७ असा १ डाव ११ गुणांनी धुव्वा उडवला. पहिल्या आक्रमणात महात्मा गांधी संघाने परेलचे १८ खेळाडू बाद करत मोठे आव्हान ठेवले होते. आक्रमणात उत्तम झोरेने ६, तर अजय राठोडने ४ गडी बाद केले. तसेच संरक्षणात अजय (४.३० मिनिटे), वेदांत कांबळे (२ मि.), कार्तिक चांदणे (२.३० मि.) यांनी छाप पाडली. सोशल संघाकडून प्रतिक माने व अनोश कदम यांनी चांगला खेळ केला.
मुलींच्या गटातील अंतिम लढतीत महात्मा गांधी विद्यामंदिरने माहीमच्या सरस्वती मंदिरवर ९-६ अशी एक डाव व ३ गुणांच्या फरकाने मात केली. मध्यंतरालाच गांधी संघाकडे ५ गुणांची आघाडी होती. त्यांच्याकडून दिव्या चव्हाण (४ मिनिटे संरक्षण व आक्रमणात ३ गडी), लक्ष्मी धनगर (२.५० मि., १ गडी) यांनी अष्टपैलू खेळ केला. सरस्वती संघाकडून हर्षदा सकपाळ व अवनी पाटील यांनी कडवी झुंज दिली.