आंतरविभागीय खो-खो स्पर्धा; ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाला दुहेरी मुकुट, हंगामातील एकंदर तिसऱ्या जेतेपदाला गवसणी

परळच्या लाल मैदानात विद्यार्थी क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या ६०व्या आंतरविभागीय खो-खो स्पर्धेत ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने दुहेरी यश संपादन केले.
आंतरविभागीय खो-खो स्पर्धा; ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाला दुहेरी मुकुट, हंगामातील एकंदर तिसऱ्या जेतेपदाला गवसणी

मुंबई : परळच्या लाल मैदानात विद्यार्थी क्रीडा केंद्राने आयोजित केलेल्या ६०व्या आंतरविभागीय खो-खो स्पर्धेत ठाण्याच्या विहंग क्रीडा मंडळाने दुहेरी यश संपादन केले. त्यांनी पुरुष व कुमार अशा दोन्ही गटांत विजेतेपदाला गवसणी घालतानाच हंगामातील एकंदर तिसरे अजिंक्यपद काबिज केले. पुरुषांच्या गटात रंजन शेट्टी, तर कुमार गटात रोहित राठोड स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

कुमार गटातील अंतिम सामन्यात विहंग क्लबने मुंबई उपनगरच्या नंदादीप स्पोर्ट्स क्लबचा ३ गुणांनी पराभव केला. रोहितने पहिल्या डावात ४.२० मिनिटे, तर दुसऱ्या डावात ५.३० मिनिटे संरक्षण केले. त्याला करण गुप्ता (आक्रमणात ३ गडी) व अमन गुप्ता (२.४० मि.) यांनी उत्तम साथ दिली. नंदादीपकडून प्रणव उत्तेकर, मंदार जंगस यांनी कडवी झुंज दिली. उपांत्य फेरीत विहंगने ज्ञानविकास स्पोर्ट्स फाऊंडेशन, तर नंदादीपने महात्मा गांधी स्पोर्ट्स अकादमीचा पराभव केला होता. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत ज्ञानविकासने महात्मा गांधी अकादमीला नमवले.

पुरुष गटाच्या अंतिम लढतीत विहंगने ठाण्याच्याच ग्रिफीन जिमखान्यावर १ गुण व २.२० मिनिटांच्या फरकाने मात केली. रंजन, लक्ष्मण गवस व आकाश कदम या त्रिकुटाने त्यांच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. रंजनने १.५० मिनिटे संरक्षण करतानाच आक्रमणात ३ गडी टिपले, तर लक्ष्मणने ३ मिनिटे संरक्षण करताना ३ गडी बाद केले. ग्रिफीनकडून राज सकपाळ, सुफियान शेख यांनी चांगला खेळ केला. उपांत्य सामन्यात विहंगने विद्यार्थी क्रीडा केंद्राचा, तर ग्रिफीनने सरस्वती स्पोर्ट्स क्लबचा पराभव केला होता. तृतीय क्रमांकाच्या लढतीत सरस्वतीने बाजी मारली.

वैयक्तिक पुरस्कार विजेते

(कुमार गट)

  • सर्वोत्तम आक्रमक : करण गुप्ता (विहंग क्रीडा मंडळ)

  • सर्वोत्तम संरक्षक : अरमान अन्सारी (नंदादीप स्पोर्ट्स क्लब)

  • सर्वोत्तम अष्टपैलू : रोहित राठोड (विहंग क्रीडा मंडळ)

    (पुरुष गट)

  • सर्वोत्तम आक्रमक : राज सकपाळ (ग्रिफीन जिमखाना)

  • सर्वोत्तम संरक्षक : लक्ष्मण गवस (विहंग क्रीडा मंडळ)

  • सर्वोत्तम अष्टपैलू : रंजन शेट्टी (विहंग क्रीडा मंडळ)

logo
marathi.freepressjournal.in