
चंदिगड : २०२५ या वर्षात सप्टेंबर अथवा ऑक्टोबर महिन्यात भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय पातळीवरील भालाफेक स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणा भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने (एएफआय) मंगळवारी केली.
चंदिगड येथे मंगळवारी एएफआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या स्पर्धेत मावळते अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांच्या जागी माजी गोळाफेकपटू बहादूरसिंग सागू यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. २०२९मध्ये होणाऱ्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी भारत दावेदारी करणार आहे. त्या निमित्ताने या वर्षात सर्व तारांकित भालाफेकपटूंसह दमदार आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी महासंघ प्रयत्नशील आहे. त्यामुळे भारताच्या नीरज चोप्रासह जुलियन वेबर, अँडरसन पीटर्स, अर्शद नदीम असे भालाफेकीतील नामांकित खेळाडू देशवासियांना एकत्रित खेळताना पाहायला मिळू शकतात. सुमारीवाला यांनीच याविषयी माहिती दिली.
“२०२९मध्ये होणारी जागतिक स्पर्धा भारतात व्हावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. त्यापूर्वी आणखी १ ते २ जागतिक पातळीवरील स्पर्धांसाठी भारत दावेदारी करणार आहे. २०२७मध्ये होणारी जागतिक रिले स्पर्धा, २०२८ची कनिष्ठ जागतिक स्पर्धा यांवरही महासंघाचे लक्ष्य आहे. २०२५मध्ये भालाफेकीतील अव्वल १० खेळाडूंसह आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भारतात आयोजन केले जाईल,” असे सुमारीवाला म्हणाले.
“या स्पर्धेसाठी १० खेळाडूंना विशेष निमंत्रण दिले जाईल. तसेच ७ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय भालाफेक दिना’च्या दिवशी स्पर्धेविषयी अधिकृत घोषणा करून पुढील माहिती देण्यात येईल. नीरज या स्पर्धेत नक्कीच सहभागी होईल,” असेही मावळते अध्यक्ष सुमारीवाला यांनी सांगितले. २०२९च्या जागतिक स्पर्धेच्या आयोजनाचा मान भारताला मिळाला, तर २०३६च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी आपल्या देशाचा ऑलिम्पिक समितीकडून नक्कीच विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
२०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरजने सुवर्णपदक काबिज केले. त्यानंतर ७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा केला जातो. पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये नीरजने रौप्यपदक जिंकले. मात्र आता तो सप्टेंबरमध्येच होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी तयारीला लागला आहे. या जागतिक स्पर्धेनंतर निवडक १० भालाफेकपटूंना भारतात आमंत्रित केले जाईल, असे समजते. त्यामुळे महासंघाला स्पर्धेचे आयोजन करण्यात यश आले, तर चाहते नीरजला पाहण्यासाठी नक्कीच स्टेडियम गाठतील.
बहादूरसिंग ॲथलेटिक्स महासंघाचे नवे अध्यक्ष
आशियाई सुवर्णपदक विजेते माजी गोळाफेकपटू बहादूरसिंग सागू यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाची (एएफआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. महासंघाच्या मंगळवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विद्यमान अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी १२ वर्षे हे पद सांभाळल्यानंतर त्यांना नियमानुसार ते पद रिक्त करावे लागेल. त्यामुळे आता बहादूर अध्यक्षपद भूषवतील. तसेच सुमारीवाला सध्या जागतिक ॲथलेटिक्सच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. लांब उडीतील माजी जागतिक पदकविजेती अंजू बॉबी जॉर्ज अध्यक्ष पदासाठी उत्सुक होती. मात्र, अंजूने अचानक माघार घेतल्यामुळे बहादूरसिंग यांचाच अर्ज शिल्लक राहिला व त्यांची बिनविरोध निवड झाली. ५१ वर्षीय बहादूर २०२९पर्यंत हे पद सांभाळतील. २००० आणि २००४च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बहादूर यांना पद्मश्री पुरस्कारानेसुद्धा गौरवण्यात आले आहे.
हे खेळाडू होणार सहभागी
नीरज चोप्रा
किशोर जेना
ज्युलियन वेबर
पीटर्स अँडरसन
अर्शद नदीम
जॅकूब वॅडलेच