महिला कॅरमपटूंसाठीही लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा! महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांचे आश्वासन

करोनाच्या काळात सामान्य माणसांपासून सेलिब्रिटी तसेच विविध क्रीडापटूही कॅरम खेळताना दिसले
महिला कॅरमपटूंसाठीही लवकरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा! महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार यांचे आश्वासन

ऋषिकेश बामणे/मुंबई : ५००हून अधिक पुरुष स्पर्धंकासह रंगलेल्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफीचे पहिले पर्व धडाक्यात पार पडले. या स्पर्धेत महिलांचा समावेश नसला तरी लवकरच महिलांसाठीही अशाच स्वरूपाची आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित करू, असे आश्वासन महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार यांनी दिले.

७ लाखांचे एकूण पारितोषिक असलेली ही चॅलेंजर्स स्पर्धा आजवरची सर्वात मोठी कॅरम स्पर्धा होती. या स्पर्धेत श्रीलंका, मालदीव, सिंगापूर व्यतिरिक्त भारताच्या १८ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले होते. काही नियम बदलल्याने स्पर्धा रंगतदार झाली. तसेच चाहत्यांनीही सामने पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे एकूणच ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

“निश्चितच प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ कधी ना कधी येते. देशासह विदेशातील महिलांनीही या स्पर्धेत खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र पहिलाच प्रयोग असल्याने आम्ही फक्त पुरुषांनाच प्रवेश दिला. प्रत्यक्षात स्पर्धा सुरू झाल्यावर असंख्य महिला कॅरमपटूंनी पुढील वेळेस त्यांनाही संधी देण्याची विनंती केली. अनेकांनी ओपन गटातच पुरुषांसह खेळण्यास तयार आहोत, असेही सांगितले. त्यामुळे भविष्यात महिलांच्या समावेशाविषयी किंवा त्यांच्यासाठीही वेगळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजित करण्याचा आम्ही विचार करत आहोत,” असे केदार म्हणाले.

त्याशिवाय शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीत कॅरमचा पुन्हा समावेश झाल्याने खेळाडूंना दिलासा मिळाला असून यामुळे त्यांची कामगिरी अधिक उंचावेल व आपोआप कॅरमची प्रगती होईल, असे केदार यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात कॅरमने तारले!

करोनाच्या काळात सामान्य माणसांपासून सेलिब्रिटी तसेच विविध क्रीडापटूही कॅरम खेळताना दिसले. कॅरमच्या निमित्ताने कुटुंबातील माणसे एकमेकांच्या जवळ आली. तो काळ सर्वांसाठीच आव्हानात्मक होता व पुन्हा असा काळ येऊ नये, हीच इच्छा आहे. मात्र कॅरम व कॅरमपटूंचे महत्त्वही नागरिकांनी लक्षात घ्यावे, हीच माझी अपेक्षा आहे, असे केदार म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in