अरोठे, मुझुमदार यांच्यात चुरस!

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आज पाच जणांची मुलाखत
अरोठे, मुझुमदार यांच्यात चुरस!

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी तुषार अरोठे आणि अमोल मुझुमदार यांच्यात चुरस आहे. त्याशिवाय इंग्लंडचे जॉन लेविस यांचे नावही शर्यतीत असल्याचे समजते. क्रिकेट सल्लागार समिती (सीएसी) शुक्रवारी मुंबईत एकूण पाच उमेदवारांची यासंबंधी मुलाखत घेणार आहे.

रमेश पोवार यांनी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद सोडल्यापासून सध्या ऋषिकेश कानिटकर हे हंगामी स्वरूपावर फलंदाजी तसेच मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडत आहे. वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या टी-२० विश्वचषकात भारताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

सध्या अशोक मल्होत्रा, सुलक्षणा नाईक, जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीला ३ जुलैपर्यंत मुख्य प्रशिक्षकाची नेमणूक करायची आहे. त्यामुळे शुक्रवार-शनिवार या दोन दिवसांत ते उमेदवारांची मुलाखत घेऊन लवकरच पुढील दोन वर्षांसाठी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करतील. आगामी दोन वर्षांत बांगलादेशमध्ये होणारा टी-२० विश्वचषक तसेच भारतात २०२५मध्ये होणारा एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या महत्त्वाच्या स्पर्धांचा समावेश आहे.

५६ वर्षीय अरोठे यांनी यापूर्वीसुद्धा भारताच्या महिला संघाचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले आहे. २०१७मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली, तेव्हा अरोठेच संघाचे प्रशिक्षक होते. तर ४८ वर्षीय मुझुमदार यांना बडोद्या रणजी संघाच्या प्रशिक्षकपदासाठी विचारणा करण्यात आल्याचेही समजते. मुझुमदार गेल्या हंगामात मुंबईचे प्रशिक्षक होते. त्यांनी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासोबतही काम केले आहे. त्याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी सल्लागाराची भूमिकाही त्यांनी बजावली आहे. तिसरे पर्याय असलेले जॉन लेविस हे इंग्लंडमधील डरहॅम या कौंटी संघाचे माजी प्रशिक्षक होते.

निवड समिती अध्यक्षपदासाठी आगरकरही शर्यतीत

एकीकडे महिला संघाचा प्रशिक्षक निवडण्यासह दुसऱ्या बाजूला बीसीसीआयला भारतीय पुरुष संघाच्या राष्ट्रीय निवड समितीच्या नव्या अध्यक्षाचीही नेमणूक करायची आहे. यामध्ये आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज तसेच मुंबईकर अजित आगरकरचे नावही शर्यतीत असल्याचे समजते. अध्यक्षपदासाठी शुक्रवारपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून १ जुलै रोजी त्यासाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. आगरकर अध्यक्ष झाल्यास निवड समितीत पश्चिम विभागाचे दोन सदस्य होतील. सध्या पश्चिम विभागाकडून सलील अंकोला निवड समितीचा भाग आहेत. उत्तर विभागाकडून सर्व अटींची पूर्तता करणारा अर्जदार न मिळाल्यास बीसीसीआयला अन्य विभागांतील एकाचीच अध्यक्षपदासाठी निवड करावी लागेल. ४५ वर्षीय आगरकरने २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ४ टी-२० सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in