राष्ट्रकुल यजमानपदासाठी अहमदाबादला प्राधान्य; २०३०मधील स्पर्धेसाठी भारत लवकरच करणार अधिकृत अर्ज; दिल्ली, भुवनेश्वरचाही पर्याय
नवी दिल्ली : २०३०मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (कॉमनवेल्थ गेम्स) यजमानपदासाठी दावेदारी करण्यास भारत पूर्णपणे सज्ज आहे. या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यास भारतातील अहमदाबाद येथे राष्ट्रकुलचे आयोजन केले जाऊ शकते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बुधवारी याविषयी अधिकृत घोषणा केली. तसेच राष्ट्रकुलमध्ये समावेश असलेल्या सर्व खेळांची तयारी करण्यास भारत समर्थ असल्याचे आश्वासनही आयओएने दिले आहे.
केंद्र सरकार तसेच केंद्रीय क्रीडा मंत्रालय २०३६मध्ये भारतात ऑलिम्पिकचे आयोजन करण्यास उत्सुक आहे. मात्र त्यापूर्वी २०३०च्या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद भूषवून भारताची तयारी दर्शवण्यासाठी केंद्र सरकार व आयओए प्रयत्नशील आहे. यासंबंधीच आयओएच्या पदाधिकाऱ्यांची बुधवारी विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. २०२६ची राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो (स्कॉटलंड) येथे होणार आहे. आता ३१ ऑगस्टपर्यंत भारताला २०३०च्या राष्ट्रकुलसाठी अधिकृत अर्ज भरावा लागणार आहे. कॅनडाने या स्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने भारताच्याच आशा बळावल्या आहेत. भारताला यजमानपद मिळाल्यास पहिल्या पसंतीचे शहर म्हणून अहमदाबादचे नाव असेल. तर दिल्ली व भुवनेश्वर या शहरांचा पर्यायही भारत तयार ठेवणार आहे, असे समजते. भारताने यापूर्वी २०१०मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रकुलचे आयोजन केले होते.
“सर्वांनी एकमताने राष्ट्रकुलचे यजमानपद मिळवण्यासाठी दावेदारी करण्याचे ठरवले आहे. आम्ही या दृष्टीने तयारीला प्रारंभ केला आहे. अहमदाबाद या स्पर्धेच्या यजमानपदासाठी तूर्तास अग्रेसर आहे. मात्र आपल्याकडे दिल्ली व भुवनेश्वरचा पर्यायही उपलब्ध आहे,” असे आयओएच्या अध्यक्षा पीटी उषा म्हणाल्या.
“२०१०मध्ये आपण राष्ट्रकुलचे यशस्वीपणे आयोजन केले होते. त्याचप्रमाणे २०३०मध्येही सर्व खेळांचा समावेश करून आपण ही स्पर्धा आयोजित करू. २०२६मधील ग्लासगो येथील राष्ट्रकुलमध्ये काही खेळांना वगळण्यात येणार आहे. मात्र आपल्या येथील राष्ट्रकुलमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) मान्य सर्व खेळांचा समावेश असेल,” असेही उषा यांनी सांगितले.
“राष्ट्रकुलमध्ये भारताला ज्या क्रीडा-प्रकारांत अधिक पदके जिंकण्याची संधी असेल, त्या खेळांना नक्कीच प्राधान्य दिले जाईल. कबड्डी, खो-खो, योगा या खेळांचा समावेश करण्याचाही विचार आहे. नेमबाजी, तिरंदाजी, हॉकी, कुस्ती, भालाफेक या खेळांमध्ये आपण नक्कीच छाप पाडू,” असे आयओएचे सरचिटणीस कल्याण चौबे म्हणाले.
एकंदरच भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने केंद्र शासन व आयओएचे हे पाऊल निर्णायक ठरणार आहे. भारताव्यतिरिक्त अद्याप अन्य कोणत्याही देशाने राष्ट्रकुलच्या यजमानपदासाठी उत्साह दर्शवलेला नाही. त्यामुळे २०३०ची राष्ट्रकुल स्पर्धा भारतात रंगण्याची दाट शक्यता आहे.