
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे शुक्रवारपासून मनोरंजनाच्या पर्वणीचा १६वा हंगाम सुरू होणार आहे. गतविजेते गुजरात टायटन्स आणि चार वेळा जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्स हे दोन संघ इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सलामीच्या लढतीत आमनेसामने येणार असून या निमित्ताचे चाहत्यांना हार्दिक पंड्या आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील द्वंद्व पाहण्याची संधी लाभणार आहे. नवे नियम तसेच काही संघांचे नवे कर्णधार यामुळे या स्पर्धेच्या सुरुवातीची उत्सुकता एव्हाना शिगेला पोहोचली आहे.
हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने गतवर्षी पदार्पणातच आयपीएल जिंकण्याची करामत केली. गुजरातचा यंदा ब-गटात समावेश करण्यात आला असून त्यांच्याकडे शुभमन गिल, राशिद खान, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया असे खेळाडू आहेत. यंदा लिलावात गुजरातने न्यूझीलंडचा अनुभवी केन विल्यम्सन, नूर अहमद आणि ओडीन स्मिथ या विदेशी खेळाडूंना खरेदी केले. त्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज के. एस. भरत आणि शिवम मावीलासुद्धा त्यांनी संघात स्थान दिले. हार्दिकचे अष्टपैलूत्व संघासाठी निर्णायक ठरेल.
दुसरीकडे आयपीएलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम संघ म्हणजे धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज. आतापर्यंत चार वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या चेन्नईला गतवर्षी गुणतालिकेत चक्क नवव्या स्थानी समाधान मानावे लागले. यंदा मात्र बेन स्टोक्ससारखा अव्वल दर्जाचा खेळाडू संघात सहभागी झाल्याने चेन्नईचे नशीब पालटणार का, याची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्याशिवाय धोनीच्या कारकीर्दीतील ही अखेरची आयपीएल असल्याची चर्चा सगळीकडे रंगत आहे.
स्टोक्सव्यतिरिक्त मोईन अली, रवींद्र जडेजा असे आघाडीचै अष्टपैलू त्यांच्या ताफ्यात आहेत. डेवॉन कॉन्वे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू यांच्यावर फलंदाजीची भिस्त असून स्टोक्स सुरुवातीच्या काही सामन्यांत तरी गोलंदाजी करणार नाही. दीपक चहर वेगवान माऱ्याचे नेतृत्व करेल. मात्र महीष थिक्षणा काही दिवस उशिराने संघात दाखल होणार असून मुकेश चौधरी दुखापतीमुळे काही लढतींना मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे चेन्नईला गोलंदाजीत फटका बसू शकतो. दरम्यान, गुरुवारी झालेल्या कर्णधारांच्या फोटोशूटमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा उपस्थित राहू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमागील कारण अद्याप समजलेले नाही.
हे पाच नवे नियम जाणून घ्या!
१. इम्पॅक्ट प्लेयर
यंदाच्या हंगामापूर्वी सर्वात जास्त चर्चेत असलेला नियम म्हणजे ‘इम्पॅक्ट प्लेअर’. यामध्ये कोणताही संघ त्यांच्या अंतिम ११ जणांमधील एखादा खेळाडू बदलू शकतो. प्रत्येक डावात १४व्या षटकापूर्वी इम्पॅक्ट प्लेअर संघात सामील करणे अनिवार्य असेल. या खेळाडूने मैदानात प्रवेश केल्यावर पंच आपले हात वर करून क्रॉसचे चिन्ह दर्शवतील. एखाद्या संघाने परदेशी खेळाडूची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड केली, तर त्यांना दुसऱ्या परदेशी खेळाडूला वगळावे लागेल. एका वेळी ४ पेक्षा अधिक परदेशी खेळाडू खेळू शकत नाहीत. त्याशिवाय इम्पॅक्ट प्लेयरच्या जागी मैदानाबाहेर पाठवलेला खेळाडू पुन्हा सामन्यात भाग घेऊ शकणार नाही. नाणेफेकीच्या वेळी कर्णधाराला चार इम्पॅक्ट प्लेयरची नावे द्यावी लागतील. यातूनच मग सामन्यादरम्यान इम्पॅक्ट प्लेयरची निवड करावी लागेल.
२. नाणेफेकीनंतर प्लेइंग-११ची घोषणा
आतापर्यंत नाणेफेकीपूर्वी अंतिम ११ खेळाडू ठरवून प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला ती लिस्ट सुपुर्द करणे गरेजेचे होते. परंतु आता नाणेफेक झाल्यानंतर कर्णधार प्लेइंग-११ जाहीर करू शकतो. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार दोन वेगवेगळ्या प्लेइंग-११च्या लिस्टसह मैदानात उतरू शकतो.
३. वाइड आणि नो-बॉलसाठी रिव्ह्यू
महिला प्रीमियर लीगमध्ये संघ वाइड आणि नो-बॉलसाठी रिव्ह्यू (डीआरएस) घेत होते. आता आयपीएलमध्येही हेच होणार आहे. वाइड किंवा नो-बॉलसाठीच्या पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्यास फलंदाजी आणि गोलंदाजी संघाकडून डीआरएस घेतला जाऊ शकतो.
४. अयोग्य हालचाल केल्यास डेड बॉल
यष्टिरक्षक किंवा मैदानावर उपस्थित असलेल्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाने गोलंदाजीदरम्यान चुकीची हालचाल केली, तर पंच तो चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करतील. यासोबतच फलंदाजी करणाऱ्या संघाला ५ धावा बहाल करता येऊ शकतील.
५. षटकांच्या संथ गतीसाठी सामन्यातच शिक्षा
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्याप्रमाणे, कटऑफ वेळेनंतर टाकल्या जाणाऱ्या सर्व षटकांदरम्यान फक्त ४ खेळाडू सीमारेषेवर राहतील. पॉवरप्लेनंतर सामान्य स्थितीत ५ क्षेत्ररक्षक सीमारेषेवर राहू शकतात. परंतु ९० मिनिटांत २० षटके पूर्ण न झाल्यास उर्वरित षटकांदरम्यान क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला त्याचा फटका सहन करावा लागेल.
संघ
चेन्नई सुपर किंग्स : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), मोईन अली, बेन स्टोक्स, डेवॉन कॉन्वे, दीपक चहर, भगत वर्मा, तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋ तुराज गायकवाड, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, सिसांडा मगाला, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पाथिराना, महीष थिक्षणा, ड्वेन प्रिटोरियस, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, अंबाती रायुडू, मिचेल सँटनर, सुभ्रांषू सेनापती, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी.
गुजरात टायटन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, राहुल तेवातिया, केन विल्यम्सन, राशिद खान, मोहम्मद शमी, शिवम मावी, यश दयाल, आर. साई किशोर, अभिनव मनोहर, वृद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, के. एस. भरत, मोहत शर्मा, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल, साई सुदर्शन, प्रदीप सांगवान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, अल्झारी जोसेफ, जोश लिटल, ओडीन स्मिथ, नूर अहमद.
सामन्याची वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमा ॲप