केकेआरचा सनसनाटी विजय; रिंकू सिंगने शेवटच्या षटकात ५ षटकार लगावत मिळवून दिला विजय

गुजरात टायटन्सवर ३ विकेट्स राखून मात, अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला चित्तथराक सामना
केकेआरचा सनसनाटी विजय; रिंकू सिंगने शेवटच्या षटकात ५ षटकार लगावत मिळवून दिला विजय

आयपीएल २०२३ मधील डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात रविवारी कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सवर ३ विकेट्स राखून विजय मिळविला. विजयासाठीचे २०५ धावांचे लक्ष्य केकेआरने निर्धारित २० षटकांत ७ बाद २०७ धावा करीत साध्य केले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात वेंकटेश अय्यर (४० चेंडूंत ८३), कर्णधार नीतिश राणा (२९ चेंडूंत ४५) आणि अखेरीस रिंकू सिंग (२१ चेंडूंत नाबाद ४८) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.

शेवटच्या षटकात केकेआरला विजयासाठी २९ धावांची आवश्यकता असताना रिंकू सिंगने यश दयालच्या शेवटच्या षटकात पाच षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी चार धावांची गरज असताना रिंकूने षटकार लगावत विजय साकार केला. रिंकूला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच शेवटच्या षटकात धावांचा पाठलाग असा यशस्वी झाला. तुफानी फलंदाजी करताना रिंकू सिंगने एक चौकार आणि एकूण सहा षटकार लगावले.

त्याआधी, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने निर्धारित २० षटकांत ४ बाद २०४ धावा केल्या. शुभमन गिल (३१ चेंडूत ३९) साई सुदर्शन (३८ चेंडूत ५३), विजय शंकर (२४ चेंडूत नाबाद ६३) यांनी दमदार फलंदाजी केली. कोलकाताच्या सुनील नरेनने ३३ धावा देत तीन विकेट्स घेतल्या. केकेआरला विजयासाठी २० षटकांत २०५ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे.

आयपीएलमध्ये दोन हजार धावा पूर्ण करणारा शुभमन दुसरा सर्वात तरुण खेळाडू

आयपीएलमध्ये दोन हजार धावा पूर्ण करणारा शुभमन गिल दुसरा सर्वात तरुण खेळाडू ठरला. शुभमन गिलने २३ वर्षे २१४ दिवसांत आयपीएलमध्ये केकेआरविरुद्ध १३ धावा करून ही कामगिरी केली. आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात २,००० धावा करण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे. त्याने अवघ्या २३ वर्षे २७ दिवसांच्या वयात हा पराक्रम केला. यानंतर शुभमन गिलने सर्वात कमी वयात २००० धावा पूर्ण करताना संजू सॅमसन, विराट कोहली आणि सुरेश रैना यांना मागे टाकले. या सामन्याआधी शुभमनने आतापर्यंत ७६ सामने खेळले. त्याने २०१६ धावा केल्या. शुभमनने या लीगमध्ये १५ अर्धशतके झळकाविली. त्याने ५० षटकार आणि २०२ चौकार लगावले.

हार्दिक थोडा आजारी; विजय शंकरला संधी

गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये हार्दिकच्या जागी अष्टपैलू विजय शंकरचा समावेश करण्यात आला. नाणेफेकीनंतर कार्यवाहक कर्णधार राशीदने सांगितले की, “हार्दिक थोडा आजारी आहे आणि संघ त्याच्यासोबत कोणतीही संधी घेऊ इच्छित नाही.”

राशिद खानची हॅट‌ट्रिक

गुजरातचा काळजीवाहू कर्णधार राशिद खानने आंद्र रसेल, सुनील नरिन आणि शार्दूल ठाकूरला बाद करत हॅट‌ट्रिक साकारली. त्याने ३७ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळविल्या.

आयपीएलमध्ये दोन हजार धावा पूर्ण करणारे सर्वात तरुण खेळाडू

१. ऋषभ पंत, २३ वर्षे २७ दिवस

२. शुभमन गिल, २३ ​​वर्षे २१४ दिवस

३. संजू सॅमसन, २४ वर्षे १४० दिवस

४. विराट कोहली, २४ वर्षे १७५ दिवस

५. सुरेश रैना, २५ वर्षे १५५ दिवस

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in