आयपीएलला दुखापतींचा आजार; ८ संघातील १२हून अधिक खेळाडू दुखापतींनी बेजार

सनरायजर्स हैदराबाद आणि गतविजेता गुजरात टायटन्स या दोन संघातील खेळाडू पूर्णत: तंदुरूस्त असल्याने या संघांनी सुटकेचा नि:श्वास सोडला
आयपीएलला दुखापतींचा आजार; ८ संघातील १२हून अधिक खेळाडू  दुखापतींनी बेजार

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होण्यास अवघे तीन दिवस उरलेले असतानाच या स्पर्धेला दुखापतींचा आजार जडल्याचे दिसत आहे. आठ संघातील १२ हून अधिक खेळाडू दुखापतींनी बेजार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना या लीगला मुकावे लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) या संघांना क्रिकेटपटूंच्या दुखापतीमुळे सर्वाधिक धक्का बसला आहे. सनरायजर्स हैदराबाद आणि गतविजेता गुजरात टायटन्स या दोन संघातील खेळाडू पूर्णत: तंदुरूस्त असल्याने या संघांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दुखापतींमुळे दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघांवर कर्णधार बदलण्याची वेळ आली. या हंगामात ऋषम पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्सने ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधार नेमले. कोलकाता नाईटरायडर्सने (केकेआर) श्रेयस अय्यरच्या जागी नितीश राणाला कर्णधारपदी नियुक्त केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान श्रेयसला दुखापत झाली होती. त्याच्या खेळण्याबाबत अद्यापही साशंकता आहे. यामुळेच केकेआरने राणाची कर्णधारपदी निवड केली. केकेआरकडून खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनही दुखापतीमुळे स्पर्धेतील सुरूवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

आरसीबीसाठी गेल्या हंगामात १५२.७५ च्या स्ट्राइक रेटने ३३३ धावा करणारा रजत पाटीदार आणि मुख्य वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड यांच्या सहभागाबद्दलही प्रश्नचिन्ह आहे. पाटीदारच्या टाचेच्या दुखापतीवर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार सुरू आहेत. हेझलवूड दुखापतीमुळे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळला नव्हता. गेल्या हंगामात सर्वात जलद शतक झळकाविणारा पाटीदार दुखापतीतून सावरल्यास खेळण्याची शक्यता आहे; पण अर्ध्या स्पर्धेपर्यंत त्याला तो बाहेरच राहावे लागणार आहे. आरसीबीकडून खेळणारा इंग्लंडचा फलंदाज विल जॅकलाही दुखापत झाली आहे. त्याच्या जागी न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेलची निवड करण्यात आली आहे.

गेल्या मोसमात सीएसकेसाठी १३ सामन्यांत १६ विकेट्स घेणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी देखील एनसीएमध्ये पाठीच्या दुखापतीवर उपचार घेत आहे. या हंगामात तो कधी उपलब्ध होईल, याबाबत शाश्वती नाही. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू काईल जेमिसन याची माघार हा सीएसकेसाठी मोठा धक्का समजला जात आहे. त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या सिसांडा मगालाला संधी देण्यात आली आहे. मुंबई इंडियन्ससाठी ट्रम्प कार्ड ठरलेला जसप्रीत बुमराह आणि ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज झाई रिचर्डसन हे दोघेही जखमी असल्याने मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मात्र, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा दिलासा आहे. आर्चर यापूर्वी आयपीएल २०२० मध्ये खेळला होता.

गेल्यावेळी आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खानच्या खांद्याला दुखापत झालेली असली; तरी तो स्पर्धेच्या उत्तरार्धात उपलब्ध होईल, अशी लखनऊ सुपरजायंट्सला आशा वाटत आहे. पंजाब किंग्जकडून गेल्या वेळी २५३ धावा करणारा जॉनी बेअरस्टोही या लीगमध्ये खेळण्याची शक्यता धूसर आहे. त्याच्या जागी बिग बॅशमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या मॅथ्यू शॉर्टचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या जागी राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा माजी गोलंदाज संदीप शर्माला संधी दिली आहे. पाठीच्या दुखापतीतून कृष्णा अद्याप बरा झालेला नाही.

दुखापतग्रस्त खेळाडू

दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, जॉनी बेअरस्टो, काइल जेम्सन, विल जॅक्स, श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णासारखे क्रिकेटपटूंचा समावेश आहे. जोश हेझलवूड, रजत पाटीदार, मोहसीन खान, लोकी फर्ग्युसन, मुकेश चौधरी सारखे क्रिकेटपटूंच्या सहभागाबद्दल देखील साशंकता निर्माण झाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in