मुंबई इंडियन्सच्या संघात मुंबईचे खेळाडू किती?

महाराष्ट्राच्या खेळाडूंना संधी दिल्यामुळे मुंबई, पुण्यातील चाहत्यांचा चेन्नईला पाठिंबा
मुंबई इंडियन्सच्या संघात मुंबईचे खेळाडू किती?

शनिवार, ८ एप्रिल, स्थळ : मुंबईचे वानखेडे स्टेडियम. मुंबई इंडियन्ससमोर चेन्नई सुपर किंग्जसारखा कट्टर प्रतिस्पर्धी समोर असताना संपूर्ण स्टेडियममध्ये मुंबईच्या चाहत्यांचे वर्चस्व पाहायला मिळणार, हेच अपेक्षित. मात्र चेन्नईच्या खेळाडूंनी ज्याप्रमाणे मैदानात रुबाबदार खेळ करून विजय मिळवला, त्याचप्रमाणे वानखेडेच्या जवळपास सर्वच स्टँडमध्येही चेन्नईचे पाठिराखे मुंबईच्या समर्थकांवर वरचढ ठरत असल्याचे दिसून आले.

मुंबई-चेन्नई यांच्यात काही दिवसांपूर्वीच झालेल्या या लढतीसाठी स्टेडियम तुडुंब भरले होते. मात्र यंदा मुंबईसह पुण्याहून आलेल्या काहींनी चेन्नईला अधिक पाठिंबा दर्शवल्याचे समोर आले. याचे कारण फक्त महेंद्रसिंह धोनी नसून चेन्नईतील महाराष्ट्र तसेच मुंबईचे खेळाडू आहेत, असे काही चाहत्यांनीच सांगितले.

मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शाम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर असे चार मुंबईकर खेळाडू आहेत. मात्र त्यापैकी फक्त रोहित व सूर्यकुमार या दोघांनाच अंतिम ११ खेळाडूंत स्थान लाभते. त्याउलट चेन्नईच्या संघात महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगर्गेकर, तर मुंबईचे अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, प्रशांत सोलंकी असे एकूण सहा खेळाडू आहेत. त्यापैकी पाच जण सातत्याने चेन्नईच्या अंतिम ११ खेळाडूंत खेळतात. यामुळेच काही चाहत्यांनी मुंबईत राहूनही यंदा चेन्नईला पाठिंबा दर्शवला आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघातील महाराष्ट्राचे खेळाडू

रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शाम्स मुलानी, अर्जुन तेंडुलकर

चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील महाराष्ट्राचे खेळाडू

ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, तुषार देशपांडे, राजवर्धन हंगर्गेकर, प्रशांत सोलंकी

"चेन्नईला पाठिंबा दर्शवण्यासाठी आम्ही खास पुण्याहून येथे आलो आहोत. त्या संघात किमान आपल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना त्यांच्यातील कौशल्य दाखवण्याची संधी तरी मिळत आहे."

- शुभम केळकर, पुणे

"मुंबईत राहूनही मी पहिल्या हंगामापासूनच चेन्नईला सपोर्ट करतो. धोनी माझा आवडता खेळाडू आहे. अनेक जण यामुळे मला डिवचतातसुद्धा. परंतु यंदा मुंबई व महाराष्ट्राचे अधिक खेळाडू चेन्नईत असल्याने मला या संघाला पाठिंबा दर्शवताना आणखी समाधान लाभते."

- करण म्हात्रे, मुंबई

"निश्चितच मुंबई इंडियन्सच्या संघात मुंबईतील खेळाडूंना संधी मिळणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक संघ वेगवेगळ्या रणनीतीनुसार संघबांधणी करतो. एकेकाळी चेन्नईच्या संघात दाक्षिणात्य खेळाडू अधिक असायचे. मात्र त्यांना यावेळी महाराष्ट्राच्या खेळाडूंमध्ये अधिक कौशल्य जाणवले असेल."

- लालचंद राजपूत, क्रिकेट प्रशिक्षक

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in