IPL 2024 : चेन्नईचे गणित गुजरात बिघडवणार?अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर उभय संघांत आज लढत

पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यंदाही बाद फेरी गाठण्याची संधी आहे.
IPL 2024 : चेन्नईचे गणित गुजरात बिघडवणार?अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर उभय संघांत आज लढत
Published on

अहमदाबाद : पाच वेळा इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला यंदाही बाद फेरी गाठण्याची संधी आहे. शुक्रवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्स मात्र त्यांचे गणित बिघडवू शकते. त्यामुळे चाहत्यांना कडवी लढत अपेक्षित आहे.

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईने ११ पैकी ६ लढती जिंकल्या असून तूर्तास ते १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत. पुढील तीनपैकी किमान दोन लढती जिंकल्यास चेन्नईचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित होऊ शकेल. तसेच गुजरातविरुद्ध यंदाच्याच हंगामात झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात चेन्नईने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे ते पुन्हा एकदा गुजरातला नमवण्यास आतुर असतील. गतवर्षी मोदी स्टेडियमवरच चेन्नईने अखेरच्या चेंडूवर गुजरातला पराभूत करून आयपीएलचे जेतेपद काबिज केले होते.

दुसरीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरातचा संघ ११ सामन्यांतील ४ विजयांच्या फक्त ८ गुणांसह गुणतालिकेत तळाशी म्हणजेच १०व्या स्थानी आहे. गुजरातचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले असून आता फक्त ते प्रतिष्ठेसाठी लढा देतील. घरच्या मैदानावर यंदाच्या हंगामात गुजरातने पाचपैकी दोनच लढती जिंकल्या आहेत. विशेषत: गेल्या काही सामन्यांत त्यांची सांघिक कामिगरीसुद्धा पूर्णपणे ढासळलेली दिसते. त्यामुळे गुजरातचा संघ चेन्नईला धक्का देणार का, हे पाहणे रंजक ठरेल. येथे झालेल्या २१ सामन्यांपैकी १३ वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला असल्याने २०० धावाही विजयासाठी पुरेशा ठरू शकणार नाहीत, असे दिसते.

गिल आणि रशिदवर नजरा

डावखुऱ्या साई सुदर्शनने यंदाच्या हंगामात गुजरातसाठी सर्वाधिक ४२४ धावा केल्या आहेत. मात्र तळाशी असलेल्या गुजरातला कर्णधार गिल व फिरकीपटू रशिद खानच्या सुमार कामगिरीचा जबर फटका बसला आहे. गेल्या काही लढतींमध्ये तर गिलने २० धावांचा टप्पाही गाठलेला नाही. त्यामुळे गिलने जबाबदारीने खेळ करणे गुजरातच्या दृष्टीने मोलाचे आहे. याव्यतिरिक्त, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, वृद्धिमान साहा यांना या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीत नूर अहमद व जोश लिटल या विदेशी खेळाडूंवर गुजरातची मदार आहे. उमेश यादव, मोहित शर्मा यांना छाप पाडता आलेली नाही. मोहम्मद शमीची अनुपस्थिती गुजरातला प्रकर्षाने जाणवत असून गिलचा नेतृत्वातील अननुभवही दिसून येत आहे. त्यामुळे चेन्नईला रोखण्यासाठी गुजरातला सर्वोत्तम खेळ करावा लागेल.

ऋतुराजवर भिस्त; दुबे, रहाणेवर दडपण

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ५४१ धावांसह दुसऱ्या स्थानी असलेला ऋतुराज सातत्याने योगदान देत आहे. मात्र मुंबईकर शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरले आहेत. विशेषत: टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्यापासून दुबे सलग दोन लढतींमध्ये भोपळाही फोडू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्याकडून मोठी खेळी अपेक्षित आहे. चाहत्यांचा लाडका महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा अखेरच्या षटकात फटकेबाजी करणे अपेक्षित आहे. गोलंदाजीत मात्र मथिशा पाथिराना व मुस्तफिझूर रहमान यांच्या अनुपस्थितीत चेन्नईची कसोटी लागेल. तुषार देशपांडे, शार्दूल ठाकूर व ग्लीसन या वेगवान त्रिकुटासह रवींद्र जडेजाच्या डावखुऱ्या फिरकीवर त्यांची भिस्त आहे. मिचेल सँटनर व मोईन अली यांचे अष्टपैलू पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे कागदावर चेन्नईचा संघ गुजरातच्या तुलनेत वरचढ वाटत आहे.

३ - ३

उभय संघांत आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ६ सामन्यांपैकी चेन्नईने ३, तर गुजरातनेही ३ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज अपेक्षित असून अहमदाबादलाच गतवर्षी चेन्नईने जेतेपदाचा चषक उंचावला होता.

प्रतिस्पर्धी संघ

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, मोईन अली, दीपक चहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगर्गेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंग, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महीष थिक्षणा, रचिन रवींद्र, शार्दूल ठाकूर, डॅरेल मिचेल, समीर रिझवी, मुस्तफिझूर रहमान, अरावेल्ली अविनाश, रिचर्ड ग्लीसन.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यम्सन, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, आर. साईकिशोर, राशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अझमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहरूख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी. आर. शरथ.

logo
marathi.freepressjournal.in