नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी चाहत्यांना दोन सामन्यांची मेजवानी मिळणार आहे. त्यात दुपारी नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमनेसामने येतील. या लढतीत दिल्ली जिंकण्यासह उष्णेतेचे आव्हानही मुंबईच्या खेळाडूंना पेलावे लागेल. टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याने दोन्ही संघांतील खेळाडू आपले कौशल्य दाखवण्यास आतुर असतील.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईने ८ पैकी ३ सामने जिंकले असून ५ लढतींमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. गेल्या लढतीत राजस्थानने मुंबईचा सहज धुव्वा उडवला. आता उर्वरित ६ पैकी किमान ५ सामने जिंकणे मुंबईसाठी गरजेचे आहे. अन्यथा त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश येऊ शकते. दिल्लीविरुद्ध वानखेडेवर झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत मुंबईने विजय मिळवला होता. त्यामुळे ते दिल्लीला सलग दुसऱ्यांदा नमवण्यासाठी आतुर असतील.
दुसरीकडे ऋषभ पंतच्या दिल्लीने ९ पैकी ४ लढती जिंकून गुणतालिकेत सहावे स्थान प्राप्त केले आहे. गेल्या सामन्यात पंतच्या धडाकेबाज खेळीमुळे दिल्लीने गुजरातवर सरशी साधली. त्याशिवाय घरच्या मैदानात खेळताना त्यांना चाहत्यांचा पाठिंबाही लाभेल. दिल्लीने पहिल्या पाचपैकी फक्त १ लढत जिंकली होती. मात्र गेल्या चारपैकी तीन सामने जिंकून त्यांनी दमदार पुनरागमन केले आहे. शनिवारी दुपारी दिल्लीतील तापमान ४० अंशापेक्षाही अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच येथील खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने २०० धावा सहज केल्या आहेत. त्यामुळे चौकार-षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे. बाद फेरीची शर्यत रंगतदार झाल्याने दोन्ही संघ विजयासाठी अथक परिश्रम घेतील.
रोहित लयीत, किशनकडून मोठी खेळी अपेक्षित
मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा उत्तम लयीत असून त्याने संघासाठी आतापर्यंत सर्वाधिक ३०३ धावा केल्या आहेत. मात्र इशान किशन व सूर्यकुमार यादव यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आढळून आला आहे. विशेषत: किशनची बॅट गेल्या काही दिवसांपासून थंड असल्याने त्याला टी-२० विश्वचषकासाठी दावेदारी पेश करण्याची अखेरची संधी असेल. स्वत: हार्दिकही या लढतीत अष्टपैलू छाप पाडण्यास आतुर असेल. तिलक वर्मा व नेहल वधेरा यांच्यावर मुंबईची मधली फळी अवलंबून आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमरा १३ बळींसह पर्पल कॅपच्या शर्यतीत असला तरी त्याला अन्य गोलंदाजांची साथ लाभणे आवश्यक आहे. जेराल्ड कोएट्झे व नुवान तुषारा यांनी धावा रोखणे गरजेचे आहे. तसेच श्रेयस गोपाळ व पियूष चावलापैकी कुणाला निवडावे, याकडेही मुंबईला लक्ष द्यावे लागेल.
पंत, अक्षर, फ्रेसर दिल्लीची ताकद
ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ३४२ धावांसह चौथ्या स्थानी असलेला पंत, डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि ऑस्ट्रेलियाचा जॅक फ्रेसर यांच्यावर दिल्लीचा संघ अवलंबून आहे. विशेषत: पंतने यष्टिरक्षणातही छाप पाडली आहे. डेव्हिड वॉर्नर संघाबाहेर असला तरी पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स असे फलंदाज दिल्लीच्या ताफ्यात आहेत. गोलंदाजीत आनरिख नॉर्किए, खलिल अहमद, मुकेश कुमार या वेगवान त्रिकुटाकडून दिल्लीला अपेक्षा आहेत. त्याशिवाय कुलदीप यादव हा त्यांच्यासाठी प्रभावी भूमिका बजावत आहे. मिचेल मार्शच्या जागी अफगाणिस्तानचा अष्टपैलू गुलबदीन नईब दिल्लीच्या संघात दाखल झाला आहे. त्यामुळे त्याला दिल्ली संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. २०२१नंतर प्रथमच बाद फेरी गाठण्यासाठी दिल्लीला आता सर्वस्व पणाला लावावे लागेल.
१९-१५
उभय संघांत आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ३४ सामन्यांपैकी मुंबईने १९, तर दिल्लीने १५ लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे आकडेवारीनुसार तरी सध्या मुंबईचे पारडे जड दिसत आहे. दिल्ली पलटवार करणार का, हे पाहावे लागेल.
प्रतिस्पर्धी संघ
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, इशान किशन, डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, पियूष चावला, शम्स मुलाणी, जसप्रीत बुमरा, जेराल्ड कोएट्झे, ल्यूक वूड, श्रेयस गोपाळ, अंशुल कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुशारा, नेहल वधेरा, हार्विक देसाई.
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भूई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स, लिझाड विल्यम्स.