हैदराबादी हिसक्याचा दिल्लीला धसका; पंत घरच्या मैदानात परतणार; अरुण जेटली स्टेडियमवर हंगामातील पहिली लढत

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी रंगणाऱ्या लढतीत बेधडक फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला रोखण्याचे आव्हान दिल्ली कॅपिटल्सला पेलावे लागणार
हैदराबादी हिसक्याचा दिल्लीला धसका; पंत घरच्या मैदानात परतणार; अरुण जेटली स्टेडियमवर हंगामातील पहिली लढत

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शनिवारी रंगणाऱ्या लढतीत बेधडक फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादला रोखण्याचे आव्हान दिल्ली कॅपिटल्सला पेलावे लागणार आहे. नवी दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे कोटला) यंदाच्या हंगामातील ही पहिलीच लढत होणार असल्याने दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतच्या पुनरागमनासाठी चाहते आतुर आहेत.

दिल्लीने सातपैकी तीन लढती जिंकून गुणतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे. विशेषत: गेल्या सामन्यात दिल्लीने गुजरातचा अक्षरश: धुव्वा उडवून नेटरनरेटमध्ये मुसंडी मारली. सुरुवातीच्या दोन लढती गमावणाऱ्या दिल्लीने गेल्या दोन सामन्यांत सहज विजय मिळवले आहेत. आतापर्यंत ते विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर दोन घरचे सामने खेळले. मात्र शनिवारपासून दिल्ली पुढील तीन सामने कोटलावर खेळणार असल्याने ते या संधीचा लाभ उचलू शकतात. २०२२नंतर प्रथमच पंत या मैदानावर सामना खेळणार आहे.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादने सहापैकी चार लढती जिंकून क्रमवारीत पहिल्या चौघांत स्थान टिकवून ठेवले आहे. हैदराबादने बंगळुरूविरुद्धच्या गेल्या सामन्यात आयपीएल इतिहासातील विक्रमी धावसंख्या रचली. विशेषत: दोन सामन्यांमध्ये हैदराबादने अनुक्रमे २७७ आणि २८७ धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे त्यांची फलंदाजी घातक ठरत आहे. कोटलाची खेळपट्टीही फलंदाजीसाठी पोषक असल्यास हैदराबाद आणखी एक मोठी धावसंख्या रचणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

कुलदीप आणि वेगवान त्रिकुटावर लक्ष

गुजरातविरुद्ध मुकेश कुमार, इशांत शर्मा व खलिल अहमद या दिल्लीच्या वेगवान त्रिकुटाने भन्नाट मारा केला. त्याशिवाय चायनामन कुलदीप यादव हा दिल्लीसाठी हुकमी एक्का ठरत आहे. अक्षर पटेल व ट्रिस्टन स्टब्ससुद्धा गोलंदाजीत योगदान देत असल्याने दिल्लीची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. फलंदाजीत डेव्हिड वॉर्नर जायबंदी असल्याने पृथ्वी शॉ व जेक फ्रेसर यांना सलामीची आणखी एक संधी मिळू शकते. विशेषत: फ्रेसरने दोन्ही सामन्यांत लक्षवेधी फलंदाजी केली. त्याशिवाय पंत सातत्याने फटकेबाजी करत असून अभिषेक पोरेलच्या रूपात दिल्लीला चांगला फलंदाज गवसला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करून २००-२२० धावा केल्यास ते नक्कीच हैदराबादला रोखू शकतात.

हेड, क्लासेन तुफानी लयीत

बंगळुरूविरुद्ध ३९ चेंडूंत शतक साकारणारा ट्रेव्हिस हेड आणि तुफान फॉर्मात असलेला हेनरिच क्लासेन यांना रोखण्याचे मुख्य आव्हान दिल्लीच्या गोलंदाजांपुढे असेल. अभिषेक शर्मा, एडीन मार्करम, अब्दुल समदही लयीत आहेत. त्यामुळे हैदराबादची फलंदाजी विरुद्ध दिल्लीची गोलंदाजी, असाच हा सामना रंगणार आहे. गोलंदाजीत कमिन्स, भुवनेश्वर कुमार आणि टी. नटराजन या वेगवान त्रिकुटाकडून हैदराबादला अपेक्षा आहेत. हैदराबादच्या गोलंदाजांनी बंगळुरूविरुद्ध २६२, तर मुंबईविरुद्ध २४६ धावा लुटल्या. त्यामुळे त्यांना या विभागात सुधारणा करणे गरजेचे आहे. फिरकीपटू मयांक मार्कंडे आणि शाहबाज नदीम यांनाही धावा रोखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे हैदराबादची गोलंदाजी काहीशी फिकी आहे.

उभय संघांत आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या २३ सामन्यांपैकी दिल्लीने ११, तर हैदराबादने १२ लढतींमध्ये बाजी मारली आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघांमध्ये चाहत्यांना कडवी झुंज अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

- दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, ए. नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भूई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स, लिझाड विल्यम्स.

- सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, विजयकांत वियासकांत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in