सूर्याची लकाकी मुंबईला तारणार? दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आज लढत

तीन पराभवांमुळे मुंबईचा संघ १०व्या स्थानी पोहोचला असून त्यांची लढत नवव्या क्रमांकावरील दिल्लीशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा विजयरथ रोखत दमदार विजयाची नोंद केली होती. दिल्लीलाही गेल्या चार सामन्यांत तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे.
सूर्याची लकाकी मुंबईला तारणार? दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आज लढत

मुंबई : आतापर्यंत सलग तीन पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्सची नौका आयपीएलच्या या समुद्रात डगमगू लागली आहे. प्ले-ऑफचा किनारा गाठण्यासाठी त्यांची धडपड सुरू असली तरी विजय मिळवून देणाऱ्या तारणहाराच्या शोधात मुंबई इंडियन्स आहे. आता तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादव दुखापतीतून सावरल्यानंतर घरच्या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे रविवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात सूर्याची लकाकी मुंबईला तारणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तीन पराभवांमुळे मुंबईचा संघ १०व्या स्थानी पोहोचला असून त्यांची लढत नवव्या क्रमांकावरील दिल्लीशी होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जचा विजयरथ रोखत दमदार विजयाची नोंद केली होती. दिल्लीलाही गेल्या चार सामन्यांत तीन पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूर्यकुमारचे पुनरागमन फक्त मुंबई इंडियन्ससाठी महत्त्वाचे नसून त्याच्यावर भारतीय संघाच्या नजराही लागल्या आहेत. सूर्यकुमारच्या फॉर्म आणि फिटनेसवरून त्याची टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड होऊ शकते. गेल्या तीन महिन्यांपासून घोट्याच्या दुखापतीवर उपचार घेतल्यानंतर त्याच्यावर हार्नियाचीही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यातून सावरल्यानंतर सूर्यकुमारने शुक्रवारी पहिल्यांदा वानखेडे स्टेडियमवर सराव केला होता. सूर्यकुमारची ताकद पाहता, त्याची बॅट तळपल्यास मुंबईला त्याचा फायदा होऊ शकतो.

सध्या मुंबईचा संघ सर्वच आघाड्यांवर धडपडत आहे. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन हे तगडे फलंदाज असले तरी त्यांना अद्याप एकही मोठी खेळी करता आलेली नाही. तिलक वर्मा आणि नमन धीर यांना मधल्या फळीत संधी मिळत असली तरी त्यांनाही मॅचविनिंग खेळी साकारता आलेली नाही. कर्णधार हार्दिक पंड्या सध्या चाहत्यांसह टीकाकारांच्याही टीकेचा धनी बनला आहे. गुजरातनंतर हैदराबादच्या चाहत्यांनीही पंड्याची हुर्यो उडवल्यानंतर घरच्या मुंबईकर चाहत्यांनी मात्र पंड्याला साथ दिली. आता चौथ्या सामन्यात मात्र पंड्याची कामगिरी कशी होते, यावर चाहत्यांच्या प्रतिसादाची अपेक्षा बाळगता येईल. मात्र हा सामना ‘स्पोर्ट्स अँड एज्युकेशन फॉर ऑल’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे एकाही चाहत्याला मैदानात हा सामना पाहण्याची संधी मिळणार नाही. त्याउलट २० हजार शालेय विद्यार्थी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करताना दिसतील.

मुंबईचे फलंदाज चमकत नसताना मध्यमगती गोलंदाज आकाश मढवाल याने मात्र मुंबईला चांगले यश मिळवून दिले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात आकाशने मुंबईला तीन बळी मिळवून दिले होते.

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत हासुद्धा अपघातानंतर १५ महिन्यांनी मैदानावर परतला आहे. त्याने आतापर्यंत सलग दोन अर्धशतकांसह १५२ धावा फटकावल्या असल्या तरी त्याला इतर फलंदाजांची साथ मिळत नाही. डेव्हिड वॉर्नर (१४८ धावा) आणि त्रिस्तान स्टब्स हे अन्य फलंदाजांपेक्षा समाधानकारक कामगिरी करत असले तरी आता सर्व फलंदाजांकडून दिल्लीला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. पृथ्वी शॉ घरच्या मैदानावर खेळत असल्यामुळे त्याच्याकडून दमदार कामगिरी दिल्लीला अपेक्षित असेल. दिल्ली कॅपिटल्सने चारही सामन्यात मिचेल मार्शला संधी दिली, मात्र त्याला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे मार्शसुद्धा मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक आहे.

दिल्लीविरुद्धच्या गेल्या सामन्यात दिल्लीचे गोलंदाज सपेशल अपयशी ठरले. त्यामुळे कोलकाताला ७ बाद २७२ धावा उभारता आल्या. यंदाच्या आयपीएलमध्ये २५०पेक्षा जास्त धावा फटकावण्याची ही दुसरी वेळ ठरली. खलील अहमद, इशांत शर्मा, अक्षर पटेल, मिचेल मार्श हे दिल्लीचे गोलंदाज कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध अपयशी ठरले होते. त्यामुळे मुंबईविरुद्ध कामगिरी उंचावण्याचे दडपण त्यांच्यावर असेल.

प्रतिस्पर्धी संघ

  • मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेव्हिस, जसप्रीत बुमरा, पियूष चावला, गेराल्ड कोट्झी, टिम डेव्हिड, श्रेयस गोपाल, इशान किशन, अनूज कंबोज, कुमार कार्तिकेय, आकाश मढवाल, क्वेना माफका, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, नमन धीर, शिवालिक शर्मा, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, तिलक वर्मा, विष्णू विनोद, नेहल वधेरा, लुक वूड.

  • दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, यश धूल, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, विकी ओत्सवाल, ऑनरिख नॉर्किया, कुलदीप यादव, जेक फ्रेझर-मॅकगर्क, खलील अहमद, इशांत शर्मा, मुकेश कुमार, त्रिस्तान स्टब्स, रिकी भुई, कुमार कुशाग्र, रसिक धर, झाय रिचर्डसन, सुमित कुमार, स्वस्तिक चिकारा, शाय होप.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in