KKR vs SRH IPL 2024: चर्चा मुंबईकर श्रेयसची; जुगलबंदी गोलंदाजांची! सर्वाधिक महागड्या स्टार्क विरुद्ध कमिन्स द्वंद्वाकडेही लक्ष

आयपीएलमध्ये शनिवारी सायंकाळी ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराजजस हैदराबाद हे संघ आमेनसामने येतील.
KKR vs SRH IPL 2024: चर्चा मुंबईकर श्रेयसची; जुगलबंदी गोलंदाजांची! सर्वाधिक महागड्या स्टार्क विरुद्ध कमिन्स द्वंद्वाकडेही लक्ष

कोलकाता : आयपीएलमध्ये शनिवारी सायंकाळी ईडन गार्डन्सवर रंगणाऱ्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स आणि सनराजजस हैदराबाद हे संघ आमेनसामने येतील. या लढतीत प्रामुख्याने कोलकाताचा मुंबईकर कर्णधार श्रेयस अय्यरकडे सर्वांचे लक्ष असेल. मात्र त्यापेक्षाही मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या आयपीएलमधील सर्वाधिक महागड्या दोन खेळाडूंमधील वेगवान जुगलबंदी पाहण्यासाठीही चाहते आतुर आहेत.

२९ वर्षीय श्रेयसला पाठदुखीमुळे गेल्या संपूर्ण हंगामाला मुकावे लागले. त्यातच बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आल्याने श्रेयस गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईसाठी श्रेयसने दमदार अर्धशतक झळकावून फॉर्मात परतल्याचे संकेत दिले. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम श्रेयससाठी कर्णधार तसेच खेळाडू म्हणून निर्णायक ठरेल. त्यातच यंदा कोलकाताला दोन वेळा आयपीएल जिंकवून देणाऱ्या गौतम गंभीरला मार्गदर्शक म्हणून नेमल्याने गंभीर व चंद्रकांत पंडित यांची जोडी काय कमाल करणार, हे पाहावे लागेल.

दुसरीकडे गतवर्षी गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिलेल्या हैदराबादच्या संघाने यंदा एडिन मार्करमऐवजी विश्वविजेता ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सकडे नेतृत्व सोपवले. त्यामुळे हैदराबाद तीन हंगामानंतर प्रथमच बाद फेरी गाठण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ईडन गार्डन्सवर दवाचा घटक निर्णायक ठरत असल्याने फिरकीपटू येथे मोलाची भूमिका बजावू शकतात.

फिरकीपटूंचाही कोलकाताकडे ताफा

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या स्टार्कवर यंदा कोलकातावासीयांचे लक्ष असेल. ऑस्ट्रेलियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज स्टार्क २०१५ नंतर प्रथमच आयपीएलमध्ये खेळणार आहे. त्याशिवाय सुनील नरिन, वरुण चक्रवर्ती, मुजीब उर रहमान, सुयश शर्मा असे फिरकीपटू त्यांच्याकडे आहेत. फलंदाजीत श्रेयसव्यतिरिक्त नितीश राणा, रिंकू सिंग, आंद्रे रसेल यांच्याकडून कोलकाताला प्रामुख्याने अपेक्षा आहेत. फिल सॉल्ट, रहमनुल्ला गुरबाझ असे धडाकेबाज फलंदाजही त्यांच्याकडे आहेत.

विदेशी खेळाडूंचा हैदराबादपुढे पेच

हैदराबादकडे विदेशी खेळाडूंचा विचार करता असंख्य पर्याय आहेत. कमिन्सव्यतिरिक्त ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, मार्करम, मार्को यान्सेन, वानिंदू हसरंगा, ग्लेन फिलिप्स असे पर्याय असल्याने ते कोणत्या चार विदेशी खेळाडूंना निवडणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भारतीय खेळाडूंचा विचार करता मयांक अगरवाल, अनुभवी भुवनेश्वर कुमार, अभिषेक शर्मा, उमरान मलिक यांच्याकडून हैदराबादला अपेक्षा असतील.

प्रतिस्पर्धी संघ

कोलकाता नाइट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), वैभव अरोरा, मिचेल स्टार्क, श्रीकर भरत, दुश्मंता चमीरा, हर्षित राणा, वेंकटेश अय्यर, मुजीब उर रहमान, सुनील नरिन, मनीष पांडे, अंक्रिश रघुवंशी, रहमनुल्ला गुरबाझ, रमणदीप सिंग, नितीश राणा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, शर्फेन रुदरफोर्ड, चेतन साकरिया, सकिब हुसैन, फिल सॉल्ट, रिंकू सिंग, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अब्दुल समद, अभिषेक शर्मा, मयांक अगरवाल, आकाश सिंग, अनमोलप्रीत सिंग, फझलहक फारुकी, वानिंदू हसरंगा, ट्रेव्हिस हेड, मार्को यान्सेन, हेनरिच क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, एडिन मार्करम, टी. नटराजन, नितीश कुमार रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, शाहबाज अहमद, जठवेध सुब्रमण्यम, राहुल त्रिपाठी, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in