IPL 2024 : लखनऊच्या कर्णधारपदावरून राहुलची लवकरच हकालपट्टी? उर्वरित सामन्यांत फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता

राहुलने या हंगामात आतापर्यंत १२ सामन्यांत ४६० धावा केल्या आहेत. मात्र त्याचा स्ट्राइक रेट अव्वल १० फलंदाजांमध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच १३६ इतका आहे.
IPL 2024 : लखनऊच्या कर्णधारपदावरून राहुलची लवकरच हकालपट्टी? उर्वरित सामन्यांत फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फलंदाज के. एल. राहुलची लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून लवकरच हकालपट्टी करण्यात येण्याची शक्यता आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलमधील सूत्रांनीच यासंबंधी माहिती दिली आहे.

राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊचा संघ तूर्तास १२ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. त्यातही बुधवारी हैदराबादकडून लखनऊने १० गडी राखून लाजिरवाणा पराभव पत्करला. लखनऊने दिलेले १६६ धावांचे लक्ष्य हैदराबादने ९.४ षटकांतच गाठले. ट्रेव्हिस हेडने ३० चेंडूंत नाबाद ८९, तर अभिषेक शर्माने २८ चेंडूंत नाबाद ७५ फटकावून लखनऊच्या गोलंदाजांचा अक्षरश: धुव्वा उडवला. या पराभवानंतर लखनऊचे संघमालक संजीव गोएंका राहुलशी रागाच्या भरात बोलताना आढळले. समाज माध्यमांवर ही चित्रफीत पसरली असून गोएंका राहुलच्या नेतृत्वशैलीशी सहमत नसल्याचे समजते. त्यामुळेच आगामी दोन सामन्यांत राहुल फक्त फलंदाज म्हणून खेळताना दिसू शकतो. त्याच्या ऐवजी निकोलस पूरन संघाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राहुलने फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर ३३ चेंडूंत फक्त २९ धावा केल्या, हेसुद्धा विशेष. त्यामुळे एकंदरच राहुलचा संघर्ष सध्या सुरू असून त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारताच्या संघातसुद्धा निवडण्यात आलेले नाही.

“लखनऊचा पुढील सामना दिल्लीविरुद्ध असून त्यापूर्वी ५ दिवसांचा अवधी आहे. राहुल उर्वरित दोन सामन्यांत फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. तसेच संघमालक त्याच्या नेतृत्वावर नाखूश असल्याने राहुल या हंगामात किंवा पुढील हंगामापूर्वी लखनऊच्या कर्णधारपदाचा राजीनामा देऊ शकतो,” असे स्पर्धेशी निगडीत पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

राहुलने या हंगामात आतापर्यंत १२ सामन्यांत ४६० धावा केल्या आहेत. मात्र त्याचा स्ट्राइक रेट अव्वल १० फलंदाजांमध्ये सर्वाधिक कमी म्हणजेच १३६ इतका आहे. पॉवरप्लेच्या षटकांचा तो योग्य लाभ उचलण्यास अपयशी ठरत आहे. त्यामुळे राहुल फलंदाजीवर लक्ष पुरवण्यासाठी लवकरच संघाचे कर्णधारपद गमावण्याची चिन्हे दिसत आहेत. आता हे कितपत खरे आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

logo
marathi.freepressjournal.in