नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मंगळवारी होणाऱ्या निर्णायक लढतीत लखनऊ सुपर जायंट्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी दोन हात करणार आहे. बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी लखनऊला उर्वरित दोन्ही लढती जिंकणे अनिवार्य आहे. त्यामुळे प्रामुख्याने या सामन्यात त्यांचा कर्णधार के. एल. राहुल कशाप्रकारे व कोणत्या स्ट्राइक रेटने खेळतो, याकडेच सर्वांचे लक्ष लागून असेल.
राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या लखनऊला गेल्या लढतीत हैदराबादने अक्षरश: नामोहरम केले. फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर लखनऊने फक्त १६५ धावा केल्या. त्यातही राहुलने पॉवरप्लेमध्ये संथगतीने फलंदाजी करताना ३३ चेंडूंत अवघ्या ८७च्या स्ट्राइक रेटने फक्त २९ धावा केल्या. हैदराबादने १० षटकांतच लक्ष्य गाठून लखनऊला धक्का दिला. राहुलच्या खेळीलासुद्धा या पराभवासाठी कारणीभूत धरण्यात आले. संघमालकही त्याच्याशी रागाच्या भरात बोलताना आढळले. लखनऊचा संघ तूर्तास १२ सामन्यांतील ६ विजयांच्या १२ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. त्यांचा नेट रनरेट (निव्वळ धावगती) फारच सुमार असल्याने दोन्ही लढती जिंकण्याशिवाय लखनऊकडे पर्याय नाही. उभय संघांत या हंगामात झालेल्या पहिल्या टप्प्यातील लढतीत दिल्लीने बाजी मारली होती. आता दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (कोटला) लखनऊ परतफेड करणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
दुसरीकडे दिल्लीला गेल्या लढतीत बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे आव्हान जर-तरवर अवलंबून आहे. १३ सामन्यांतील ६ विजयांच्या १२ गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी असला तरी अखेरची लढत जिंकूनही ते बाद फेरी गाठू शकतील की नाही, याविषयी संभ्रम आहे. त्यांची धावगतीसुद्धा लखनऊप्रमाणेच खराब आहे. अशा स्थितीत दिल्लीला मोठा विजय अपेक्षित आहे. दिल्लीने या हंगामात कोटला येथील चारपैकी तीन सामन्यांत प्रथम फलंदाजी करून विजय मिळवला आहे. येथील चारही सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने किमान २२० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे धावांचा पाठलाग करण्यापेक्षा प्रथम फलंदाजी करणे, येथे सोयीचे ठरू शकते.
पंतचे पुनरागमन दिल्लीला तारणार?
बंगळुरूविरुद्धच्या निर्णायक लढतीत पंतची अनुपस्थितीत दिल्लीला महागात पडली. मात्र या लढतीसाठी पंत परतणार असून त्याच्याशिवाय सलामीवीर जेक-फ्रेसर, अभिषेक पोरेल यांच्याकडून दिल्लीला फलंदाजीत चमकदार कामगिरीची आशा आहे. पृथ्वी शॉला दिल्ली संधी देऊ शकते. डेव्हिड वॉर्नरनेसुद्धा या हंगामात निराशा केलेली आहे. मधल्या फळीत ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, शाय होप असे फलंदाज दिल्लीकडे आहेत. मात्र त्यांच्यावरही अतिरिक्त दडपण असेल. गोलंदाजीत चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव दिल्लीचे प्रमुख अस्त्र असेल. त्याशिवाय इशांत शर्मा, खलिल अहमद, मुकेश कुमार व रसिक सलाम या वेगवान चौकडीवर लखनऊच्या फलंदाजांना रोखण्याची जबाबदारी असेल. गेल्या २ हंगामात दिल्लीला बाद फेरी गाठता आलेली नाही.
स्टोइनिस, पूरनकडून मोठी खेळी अपेक्षित
लखनऊचे सलामीवीर राहुल व क्विंटन डीकॉक यंदा लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेले नाहीत. त्यामुळे मार्कस स्टोइनिस आणि निकोलस पूरन या मधल्या फळीतील अनुभवी जोडीवर लखनऊची मदार आहे. गेल्या काही सामन्यांत ही जोडी अपयशी ठरल्याने लखनऊलाही सलग दोन सामने गमवावे लागले. त्याव्यतिरिक्त, दीपक हूडा, आयुष बदोनी आणि कृणाल पंड्या यांच्याकडूनही योगदान अपेक्षित आहे. गोलंदाजीत मोहसिन खान, मॅट हेन्री, नवीन उल हक या वेगवान त्रिकुटावर लखनऊ अवलंबून आहे. फिरकीपटू रवी बिश्नोईलासुद्धा छाप पाडता आलेली नाही. तसेच मयांक यादवला झालेली दुखापत लखनऊला महागात पडली आहे. यश ठाकूर क्षेत्ररक्षणात ढिसाळ कामगिरी करत आहे. त्यामुळे लखनऊला एकूणच सांघिक कामगिरी उंचवावी लागेल.
३-१
उभय संघांत आयपीएलमध्ये आतापर्यंत झालेल्या ४ सामन्यांपैकी लखनऊने ३, तर दिल्लीने १ लढत जिंकली आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार लखनऊचे पारडे जड असले तरी दिल्ली त्यांना नक्कीच धक्का देऊ शकते.
प्रतिस्पर्धी संघ
दिल्ली कॅपिटल्स : ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, स्वस्तिक चिकारा, यश धूल, आनरिख नॉर्किए, इशांत शर्मा, झाए रिचर्डसन, खलील अहमद, कुलदीप यादव, मुकेश कुमार, प्रवीण दुबे, रसिक दर, विकी ओस्तवाल, अक्षर पटेल, जेक फ्रेसर-गर्क, ललित यादव, सुमित कुमार, अभिषेक पोरेल, कुमार कुशाग्र, रिकी भूई, शाय होप, ट्रिस्टन स्टब्स, लिझाड विल्यम्स.
लखनऊ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टोइनिस, दीपक हूडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्नोई, नवीन उल हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शीन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲश्टन टर्नर, डेव्हिड विली, अर्शद खान, मॅट हेन्री.