सलग तिसऱ्या विजयाचे लखनौचे ध्येय; बलाढ्य गुजरात टायटन्सशी आज भिडणार

मयांक यादवने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर लागोपाठ दोन सामनावीराचे पुरस्कार पटकावले आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात त्याने तीन बळी मिळवत इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला चकित केले होते.
सलग तिसऱ्या विजयाचे लखनौचे ध्येय; बलाढ्य गुजरात टायटन्सशी आज भिडणार

लखनौ : वेगवान गोलंदाज मयांक यादवने दमदार कामगिरी करत लखनौ सुपरजायंट्सला घवघवीत यश मिळवून दिले आहे. त्याच्या मॅचविनिंग गोलंदाजीमुळे लखनौने पहिल्या पराभवानंतर सलग दोन सामने जिंकले आहेत. आता रविवारी बलाढ्य गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयी हॅट‌्ट्रिक साजरी करण्याचे त्यांचे ध्येय आहे.

मयांक यादवने आपल्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर लागोपाठ दोन सामनावीराचे पुरस्कार पटकावले आहेत. पंजाब किंग्जविरुद्धच्या आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात त्याने तीन बळी मिळवत इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला चकित केले होते. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धही त्याने तीन विकेट्स मिळवत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल आणि कॅमेरून ग्रीन यांना माघारी पाठवले होते. या सामन्यात ताशी १५१ किमी वेगाने गोलंदाजी करत त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. भन्नाट कामगिरीमुळे त्याने निवड समितीचेही लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या दोन सामन्यांतील मयांकच्या कामगिरीवरून भारतीय संघाचे दरवाजे त्याच्यासाठी खुले होणार नसले तरी निवड समिती त्याच्या गोलंदाजीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

लखनौचा सलामीवीर क्विंटन डीकॉक सध्या चांगल्या फॉर्मात असून त्याला कर्णधार लोकेश राहुलची अपेक्षेप्रमाणे साथ लाभत नाही. निकोलस पूरन मोठी फटकेबाजी करून संघाच्या विजयात योगदान देत असून कृणाल पंड्याही चांगली कामगिरी करत आहे. मात्र देवदत्त पडिक्कल आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस यांची खराब कामगिरी लखनौची डोकेदुखी वाढवत आहे.

गोलंदाजीत मयांकला नवीन उल-हक, यश ठाकूर, मोहसिन खान, मार्कस स्टॉइनिस आणि लेगस्पिनर रवी बिश्णोई यांच्याकडून चांगली साथ अपेक्षित आहे. लखनौचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे.

गुजरातने नवनियुक्त कर्णधार शुभमन गिल याच्या नेतृत्वाखाली दोन विजय आणि दोन पराभव अशी संमिश्र कामगिरी केली आहे. गिलने पंजाब किंग्जविरुद्धच्या गेल्या सामन्यात ४८ चेंडूंत नाबाद ८९ धावा फटकावल्या होत्या. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ ठरली होती. गुजरातचा बी. साई सुदर्शन चांगल्या फॉर्मात असून वृद्धिमन साहा आणि विजय शंकर यांना कामगिरी उंचवावी लागणारआहे. मोहित शर्मा गुजरातसाठी लाभदायक ठरला असला तरी गोलंदाजीत त्याला अझमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, रशिद खान आणि नूर अहमद यांच्याकडून चांगली साथ अपेक्षित आहे.

प्रतिस्पर्धी संघ

  • गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमन साहा, रॉबिन मिंझ, केन विल्यम्सन, अभिनव मंदार, बी. साई सुदर्शन, दर्शन नलकांडे, विजय शंकर, अझमतुल्ला ओमरझाई, शाहरूख खान, जयंत यादव, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, साई किशोर, उमेश यादव, रशिद खान, जोशुआ लिटिल, मोहित शर्मा आणि मानव सुतार.

  • लखनौ सुपर जायंट्स : लोकेश राहुल (कर्णधार), क्विंटन डीकॉक, निकोलस पूरन, आयुष बदोनी, कायले मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिक्कल, रवी बिश्णोई, नवीन उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शमर जोसेफ, मयांक यादव, मोहसिन खान, के. गौतम, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, ॲॅश्टन टर्नर, मॅट हेन्री आणि मोहम्मद अर्शद खान.

logo
marathi.freepressjournal.in