अखेर मुंबईच्या विजयाची बोहनी! दिल्लीवर २९ धावांनी मात; शेफर्डची अष्टपैलू चमक, रोहितची बॅट तळपली

‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल’ म्हणजेच ‘ईएसएफए’ या अभियाना अंतर्गत या लढतीसाठी मुंबईतील विविध भागांतून शालेय मुलांना आयपीएलचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आणण्यात आले होते.
अखेर मुंबईच्या विजयाची बोहनी! दिल्लीवर २९ धावांनी मात; शेफर्डची अष्टपैलू चमक, रोहितची बॅट तळपली

ऋषिकेश बामणे/मुंबई

सलग तीन सामन्यांत पराभव पत्करल्यावर अखेर रविवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने विजयाची बोहनी केली. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शालेय मुलांच्या उपस्थितीत झालेल्या या लढतीत रोमारियो शेफर्डने (१० चेंडूंत नाबाद ३९ धावा आणि १ बळी) केलेल्या अष्टपैलू कामगिरीला रोहित शर्मा (२७ चेंडूंत ४९), जसप्रीत बुमरा (२२ धावांत २ बळी) यांची उत्तम साथ लाभली. त्यामुळे मुंबईने दिल्ली कॅपिटल्सवर २९ धावांनी मात करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. मुंबईने दिलेल्या २३५ धावांचा पाठलाग करताना दिल्लीला २० षटकांत ८ बाद २०५ धावाच करता आल्या.

‘एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल’ म्हणजेच ‘ईएसएफए’ या अभियाना अंतर्गत या लढतीसाठी मुंबईतील विविध भागांतून शालेय मुलांना आयपीएलचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आणण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत मुंबई चांगली कामगिरी करेल, अशी आशा चाहत्यांना होती. त्या आशेवर मुंबईचे खेळाडू खरे उतरले. हंगामातील पहिल्या विजयासह मुंबईने थेट १०व्या स्थानावरून आठव्या स्थानी झेप घेतली, तर दिल्लीची पाच लढतींमधील चौथ्या पराभवामुळे अखेरच्या क्रमांकावर घसरण झाली. शेफर्ड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता गुरुवारी मुंबईची वानखेडेवरच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी गाठ पडेल.

दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र त्याचा हा निर्णय रोहित शर्मा आणि इशान किशन या मुंबईच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवला. या दोघांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांत ७५ धावा कुटल्या. विशेषत: रोहितने यावेळी नैसर्गिक शैलीत फटकेबाजी करताना ६ चौकार व ३ षटकार लगावले. तो हंगामातील पहिले अर्धशतक साकारणार, असे वाटत असतानाच अक्षर पटेलने ४९ धावांवर रोहितचा त्रिफळा उडवला. पुढच्याच षटकात पुनरागमन करणारा सूर्यकुमार यादव शून्यावरच माघारी परतला.

दुसऱ्या बाजूने इशानने ४ चौकार व २ षटकारांसह २३ चेंडूंत ४२ धावा फटकावून संघाला ९ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठून दिला. मात्र पटेलने त्याचा अफलातून झेल पकडला. तिलक वर्माही (६) यावेळी छाप पाडू शकला नाही. ४ बाद १२१ धावांवरून कर्णधार हार्दिक पंड्या आणि टिम डेव्हिड यांची जोडी जमली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी रचली. आनरिख नार्किएने पंड्याला ३९ धावांवर बाद केले.

त्यानंतर मात्र मैदानावर आगमन झालेल्या वेस्ट इंडिजच्या २९ वर्षीय शेफर्डने अवघअया १० चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांची आतषबाजी केली. त्याशिवाय डेव्हिडने २ चौकार व ४ षटकारांसह २१ चेंडूंत नाबाद ४५ धावा फटकावल्या. त्यामुळे मुंबईने २० षटकांत ५ बाद २३४ धावांचा डोंगर उभारला. नॉर्किएने टाकलेल्या अखेरच्या षटकात शेफर्डने तब्बल ४ षटकार व २ चौकार लगावताना ३२ धावा लुटल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने डेव्हिड वॉर्नरला (१०) लवकर गमावले. शेफर्डनेच त्याचा बळी मिळवला. मात्र मुंबईकर पृथ्वी शॉ (६६) आणि अभिषेक पोरेल (४१) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी रचून दिल्लीला सामन्यात टिकवून ठेवले. अखेर बुमराने अप्रतिम यॉर्करवर पृथ्वीचा त्रिफळा उडवला, तर अभिषेकलाही माघारी पाठवले. पंतही १ धावेवर बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने २५ चेंडूंत तब्बल नाबाद ७१ धावा फटकावून अखेरपर्यंत झुंज दिली. मात्र दिल्लीला २० षटकांत ८ बाद २०५ धावांपर्यंतच मजल मारता आली. जेराल्ड कोएट्झेने चार, तर बुमराने दोन बळी मिळवले.

हार्दिक-रोहितचे आलिंगन

फलंदाजीत धुमाकूळ घातल्यानंतर मैदानात रोहितची देहबोली अतिशय ॲक्टीव्ह व आक्रमक दिसून आली. त्याशिवाय तो हार्दिकशीही सातत्याने संवाद साधताना दिसून आला. रोहितनेच अखेरच्या चेंडूवर झेल घेतल्यावर हार्दिकने त्याला आलिंगन दिले. त्यावेळी स्टेडियममधील चाहत्यांनी जल्लोष केला. याव्यतिरिक्त, या लढतीत हार्दिकला कुणी फारसे डिवचलेसुद्धा नाही.

  • १ टी-२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने २३४ धावा करूनही एकाही फलंदाजांने वैयक्तिक अर्धशतक झळकावले नाही.

  • ६ मुंबईने दिल्लीविरुद्ध सहाव्यांदा २००हून अधिक धावा केल्या. तसेच मुंबईने एकंदर २४व्यांदा आयपीएलमध्ये २००पेक्षा अधिक धावसंख्या उभारली. चेन्नईने २९ वेळा अशी कामगिरी केली आहे.

  • २३४ वानखेडे स्टेडियमवर मुंबईने सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. यापूर्वी २०१७मध्ये मुंबईने वानखेडेवर पंजाबविरुद्ध २२३ धावा केल्या होत्या.

  • १५० बुमराने आयपीएल कारकीर्दीतील १५० बळींचा टप्पा गाठला. एकाच संघासाठी १५० बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. यापूर्वी लसिथ मलिंगा (मुंबईसाठी १७० बळी) आणि सुनील नरिन (कोलकातासाठी १६६ बळी) यांनी अशी कामगिरी केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in