MI vs SRH : वानखेडेवर आज फटकेबाजीची पर्वणी; मुंबईसमोर हैदराबादचे कडवे आव्हान; विजयी लय कायम राखण्याचे दोन्ही संघांचे ध्येय

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी चाहत्यांना फटकेबाजीची पर्वणी अनुभवता येणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ गुरुवारी आमनेसामने येणार असून दोन्ही संघांत धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे.
MI vs SRH : वानखेडेवर आज फटकेबाजीची पर्वणी; मुंबईसमोर हैदराबादचे कडवे आव्हान; विजयी लय कायम राखण्याचे दोन्ही संघांचे ध्येय
Published on

क्रीडा प्रतिनिधी/मुंबई

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी चाहत्यांना फटकेबाजीची पर्वणी अनुभवता येणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ गुरुवारी आमनेसामने येणार असून दोन्ही संघांत धडाकेबाज फलंदाजांचा भरणा आहे. त्यामुळे चौकार-षटकारांच्या आतषबाजीत कोण बाजी मारणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईने यंदाच्या हंगामात पुन्हा एकदा काहीशी संथ सुरुवात केली आहे. सहापैकी फक्त २ लढती जिंकणारा मुंबईचा संघ गुणतालिकेत सातत्याने सातव्या किंवा आठव्या स्थानी राहिला आहे. मात्र गेल्या लढतीत मुंबईने दिल्लीला त्यांच्याच मैदानात हरवले. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला मुंबईचा संघ आता घरच्या मैदानातील पलटणसमोर विजयी कामगिरीत सातत्य राखेल, अशी आशा आहे.

दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या हैदराबादनेही ६ पैकी २ सामने जिंकले आहेत. पहिल्या लढतीत राजस्थानला नमवल्यानंतर हैदराबादला सलग चार सामने गमवावे लागले. मात्र पंजाबविरुद्ध चक्क २४५ धावांचा यशस्वी पाठलाग करून हैदराबादने पराभवाची मालिका संपुष्टात आणली. त्यामुळे आता मुंबईला ते कडवी झुंज देतील, अशी अपेक्षा आहे.

वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांना पोषक व येथे दव येत असल्याने धावांचा पाठलाग करणेही अनेकदा सोपे जाते. २०२४पासून येथे झालेल्या ९ पैकी ५ सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. हैदराबादच्या संघातील ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेनरिच क्लासेन या धडाकेबाज त्रिकुटाविरुद्ध मुंबईचे ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमरा व दीपक चहर या वेगवान गोलंदाजांची जुगलबंदी लढतीचे मुख्य आकर्षण असेल.

वेगवान त्रिकुट आणि फलंदाजांवर नजरा

बोल्ट, बुमरा, चहर यांच्या रुपात दर्जेदार वेगवान त्रिकुट मुंबईकडे आहे. त्याशिवाय मिचेल सँटनर व कर्ण शर्माही फिरकीद्वारे छाप पाडत आहेत. त्यामुळेच सध्या मुंबईसाठी गोलंदाजी विभाग फलंदाजीपेक्षा अधिक संतुलित वाटत आहे. कर्णधार हार्दिक अष्टपैलू योगदान देत आहे. रोहित शर्माची बॅट या लढतीत तळपावी, अशी चाहत्यांना आशा असेल. तसेच रायन रिकल्टन, सूर्यकुमार यादव यांनाही एखाद-दुसरी लढत वगळता चमक दाखवता आलेली नाही. तिलक वर्मा व नमन धीर यांच्यावर मुंबईची फलंदाजी अवलंबून आहे. विल जॅक्सच्या जागी अन्य एखादा फलंदाज किंवा अष्टपैलू खेळवण्याचा पर्याय मुंबईकडे उपलब्ध आहे. सांघिक कामगिरी केल्यास मुंबईला रोखणे कठीण जाईल.

हेड, अभिषेकपासून सावध

हैदराबादसाठी गेल्या लढतीत ५५ चेंडूंत १४१ धावांची घणाघाती खेळी साकारणारा अभिषेक व त्याचा डावखुरा साथीदार हेड या सलामीवीरांना रोखण्याचे आव्हान मुंबईपुढे असेल. ग‌तवर्षी हैदराबादने मुंबईविरुद्ध २७७ धावा फटकावल्या होत्या. त्यामुळे आता वानखेडेवरही त्यांचे फलंदाज थैमान घालण्यास आतुर असतील. इशान किशनची बॅट थंडावली असून नितीश रेड्डीकडूनही कामगिरीत सुधारणा अपेक्षा आहे. क्लासेन व अनिकेत वर्मा लयीत आहेत. गोलंदाजी मात्र हैदराबादसाठी चिंतेचा विषय आहे. मोहम्मद शमी, कमिन्स, हर्षल पटेल व कामिंदू मेंडिस असे खेळाडू असूनही हैदराबादविरुद्ध प्रतिस्पर्धी संघ २०० धावा सहज करत आहेत. त्यामुळे मुंबईसुद्धा या गोष्टीचा नक्कीच लाभ घेईल.

स्टेनचे ‘ते’ ट्वीट वायरल

माजी वेगवान गोलंदाज तसेच गेल्या हंगामापर्यंत हैदराबादचा गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या डेल स्टेनने आयपीएलच्या सुरुवातीलाच एक लक्षवेधी ट्वीट केले होते. “१७ एप्रिल रोजी आयपीएलमध्ये प्रथमच ३०० धावांचे शिखर गाठले जाईल. कदाचित तो सामना पाहण्यासाठी मीसुद्धा असेन,” असे ट्वीट स्टेनने २३ मार्च रोजी केले होते. मात्र त्याने कोणता संघ ३०० धावा करेल, हे नमूद करणे जाणीवपूर्वक टाळले. मात्र तेव्हापासून सर्वांनाच १७ एप्रिलची उत्सुकता लागून आहे. २३ मार्चला हैदराबादने राजस्थानविरुद्ध २८६ धावा केल्या होत्या. त्या लढतीनंतर स्टेनने हे ट्वीट केले होते.

प्रतिस्पर्धी संघ

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, विल जॅक्स, दीपक चहर, मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, रीस टॉप्ली, रॉबिन मिन्झ, कर्ण शर्मा, विघ्नेश पुथूर, बेव्हन जेकब्स, सत्यनारायण राजू, राज बावा, अश्वनी कुमार, क्रिशन श्रीजिथ, अर्जुन तेंडुलकर, मुजीब उर रहमान, कॉर्बिन बोश.

सनरायजर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रेव्हिस हेड, हेनरिच क्लासेन, अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, अथर्व तायडे, इशान मलिंगा, हर्षल पटेल, इशान किशन, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, मोहम्मद शमी, राहुल चहर, सचिन बेबी, सिमरजीत सिंग, झीशान अन्सारी, वियान मल्डर, रविचंद्रन स्मरण.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप

logo
marathi.freepressjournal.in