IPL आधी सनरायजर्स हैदराबादचा मोठा निर्णय; मार्करमकडून कमिन्सकडे सोपवले नेतृत्व

ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली.
IPL आधी सनरायजर्स हैदराबादचा मोठा निर्णय; मार्करमकडून कमिन्सकडे सोपवले नेतृत्व
Published on

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाचा विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सची आयपीएलच्या आगामी हंगामासाठी सनरायजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य म्हणजे एडीन मार्करमच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स ईस्टर्न केपने आफ्रिकेतील टी-२० स्पर्धा जिंकली होती. तरीही त्याची हकालपट्टी का करण्यात आली, हे अनाकलनीय आहे. हैदराबादने गेल्या तीन आयपीएल हंगामांत बाद फेरी गाठलेली नाही.

३० वर्षीय कमिन्सला हैदराबादने लिलावात २०.५० कोटी रुपयांमध्ये करारबद्ध केले. तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील दुसरा महागडा खेळाडू ठरला. कमिन्स यापूर्वी कोलकाता व दिल्लीकडून खेळला आहे. मात्र आयपीएलमध्ये प्रथमच तो एखाद्या संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. गेल्या तीन हंगामांत कमिन्स हा हैदराबादचा तिसरा कर्णधार ठरला.

व्हिटोरी मुख्य प्रशिक्षक

न्यूझीलंडचा अनुभवी माजी फिरकीपटू डॅनिएल व्हिटोरीची ब्रायन लाराच्या जागी हैदराबादच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. तसेच डेल स्टेनऐवजी जेम्स फ्रँकलिन या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक असेल. हैदराबादचा संघ २३ मार्च रोजी कोलकाताविरुद्ध सलामीचा सामना खेळणार आहे.

कॉन्वे आयपीएलला मुकणार

चेन्नईकडून खेळणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉन्वे डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने आयपीएलला मे महिन्यापर्यंत मुकणार आहे. कॉन्वेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० सामन्यात दुखापत झाली. कॉन्वेच्या हातावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in